शरद पवार विचार मंच व मानवता एक धर्म सामाजिक संस्थेचा उपक्रम
सुफी, साधू, संतांची दिलेला मानवतेचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी गुण्यागोविंदाने एकत्र येण्याचे गरज -अल्ताफ सय्यद
अहमदनगर (प्रतिनिधी)- रमजाननिमित्त शहरातील इव्हॅन्जलीन बूथ हॉस्पिटलला गरजू रुग्णांना आवश्यक असलेल्या दैनंदिन गरजेच्या खाद्य वस्तूंसह अन्न-धान्याची मदत देण्यात आली. शरद पवार विचार मंच व मानवता एक धर्म सामाजिक संस्थेच्या वतीने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
शरद पवार विचार मंचचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ सय्यद यांनी ही मदत हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जुनेद तांबटकर, तालुकाध्यक्ष अर्जुन बडेकर, मुजीर सय्यद, अयान सय्यद, हाजीक सय्यद, प्रसाद दरंदले आदी उपस्थित होते.
अल्ताफ सय्यद म्हणाले की, कोरोना काळात बूथ हॉस्पिटलने अनेकांना नवजीवन देण्याचे काम केले. हे काम मानवतेच्या दृष्टीकोनाने दिशादर्शक आहे. कोरोनात सर्व समाजाने जात, धर्म, पंथ विसरून एकजुटीने कोरोनाशी लढा दिला. मात्र कोरोना संपल्यानंतर राजकीय हेतू साधण्यासाठी समाजात द्वेष पसरण्याचे काम केले जात आहे. याला बळी न पडता युवकांनी सामाजिक एकात्मता ठेवण्याची गरज आहे. अहमदनगर ही सुफी, साधू, संतांची भूमी असून, या महात्म्यांनी सर्व समाजाला मानवतेचा विचार दिला. हा मानवतेचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी गुण्यागोविंदाने एकत्र येण्याचे त्यांनी आवाहन केले.
मेजर देवदान कळकुंबे यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून शरद पवार विचार मंच व मानवता एक धर्म सामाजिक संस्थेचे बूथ हॉस्पिटलला आधार देण्याचे काम केले. मानवतेसाठी सुरु असलेल्या कार्यासाठी मानवतावादी विचार करणारे लोक पुढे येत असतात. रमजाननिमित्त घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. बूथ हॉस्पिटलला देण्यात आलेल्या मदतीमध्ये साखर, तांदूळ, अंडी, पाण्याचे बॉक्स, चहापत्ती आदींचा समावेश आहे.