अखंड हरिनाम सप्ताहात रामेश्वर महाराज शास्त्री यांच्या हस्ते सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील उद्योजक पैलवान अफजल शेख यांनी ब्रम्हनाथ मंदिराच्या उभारणीसाठी योगदान देऊन धार्मिक ऐक्याचे दर्शन घडविले. शिरुर (जि. बीड) येथील ब्रम्हनाथ उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाला शेख हजेरी लावली होती. यावेळी संस्थानच्या वतीने भागवताचार्य ह.भ.प. रामेश्वर महाराज शास्त्री यांनी सप्ताहात त्यांचा जाहीर सत्कार केला.
रामेश्वर महाराज शास्त्री म्हणाले की, गावात 2021 पासून ब्रम्हनाथ मंदिराचे काम सुरु होते. ते नुकतेच पूर्णत्वाला गेले आहे. या मंदिराच्या कामासाठी अनेकांचे हातभार लागले. उद्योजक पैलवान अफजल शेख यांनी सातत्याने मंदिर निर्माणासाठी केलेली मदत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
पवित्र रमजान महिन्यात उद्योजक अफजल शेख यांनी हिंदू बांधवांच्या धार्मिक सोहळ्याला उपस्थित राहून मंदिरासाठी दिलेल्या योगदानाने देशातील गंगा, जमुनी तहजीब चे दर्शन घडविले. उद्योजक शेख यांचे शहरात सातत्याने सामाजिक कार्य सुरु आहे. महापुरुषांच्या जयंती उत्सव साजरी करुन व विविध सामाजिक उपक्रमाने ते धार्मिक सौहार्द जपण्याचे काम करत असतात.