शाखा व्यवस्थापक व अधिकार्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
तडजोडीने खोटा गुन्हा दाखल करणार्या त्या सहायक पोलीस निरीक्षकाचेही निलंबनासाठी आग्रह
अहमदनगर (प्रतिनिधी)- सहकार विभागाने कोट्यावधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात जबाबदार धरलेल्या सैनिक बँकेचा तत्कालीन शाखा व्यवस्थापक व बँकेच्या अधिकार्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना बडतर्फ करण्याची मागणीसाठी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी सहकार आयुक्त व मुंबई पोलीस महासंचालकांना निवेदन देऊन मुंबईच्या आझाद मैदानात मंगळवार (दि.11 एप्रिल) पासून उपोषण सुरु केले आहे. गुन्हे दाखल होत नाही, तो पर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा पवित्रा रोडे यांनी घेतला आहे.
रोडे यांनी निवेदनात म्हंटले आहे की, सैनिक बँकेत चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी व काही संचालक यांना हाताशी धरत फरांडे गेली 10 वर्ष कर्जत शाखेत शाखा व्यवस्थापक होता. या काळात कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार, अपहार, झाला असल्याच्या तक्रारी सहकार खात्याकडे दाखल आहेत. सैनिक बँकेच्या कर्जत शाखेत धनादेश क्लिअरिंगमध्ये अफरातफर करून पावणेदोन कोटी रुपयांचा घोटाळा अध्यक्ष शिवाजी व्यवहारे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे व शाखा अधिकारी सदाशिव फरांडे यांच्या सहभागातून झाला असून, वरील सर्वांना जबाबदार धरण्यात आल्याचा अहवाल सहकार विभागाचे पारनेर सहाय्यक निबंधक गणेश औटी यांनी दिला आहे. त्यामुळे औटी यांनीच सहकार विभागाच्या वतीने फिर्यादी होवून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट केले आहे.
1 कोटी 79 लाख अपहार प्रकरणी एस.एन. पिंगळे (अप्पर लेखा परीक्षक प्रथम श्रेणी ) यांची नियुक्ती सहकार विभागाने केली असून, तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. 1 कोटी 79 लाख अपहाराच्या प्रकरणात जबाबदारी असणार्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजय बा. कोरडे शिवाजी व्यवहारे व संचालक मंडळ सुटण्यासाठी सदर अपहार लिपिकांवर ढकलत असल्याचा प्रकार सुरु आहे. कोरडे व सदाशिव फरांडे यांनी संजय निराधार योजनेतही असाच प्रकार केला होता त्यात तत्कालीन लिपीक दीपक आनारसे याला बळीचा बकरा बनवत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, असेही रोडे यांनी म्हंटले आहे. सदरचा गुन्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करावा, कर्जत येथील चौकशी अधिकारी हे धिम्या गतीने तपास करत असून त्यांचेवर त्वरित दफ्तर दिरंगाई, शिस्तभंग अन्वये कारवाई करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.