नागरिकांच्या भावना केंद्र व राज्य सरकारला निवेदनासह पाठविणार -शिवम भंडारी
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार छावणी परिषदेचा समावेश अहमदनगर महापालिकेत होण्यासाठी भिंगारमध्ये नागरिकांची स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. छावणी परिषदेच्या जाचक अटी व समस्यांनी त्रासलेल्या नागरिकांनी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून भिंगारचे महापालिकेत समावेश करण्याची मागणी करुन स्वाक्षर्या केल्या. हजारो नागरिकांचे स्वाक्षर्यासह भिंगार छावणीचे महापालिकेत समावेश करण्याच्या मागणीचे निवेदन पंतप्रधान कार्यालय, नगर विकास मंत्री यांना पाठविण्यात येणार आहे. तर राज्य सरकारला पाठपुरावा करण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांना हे निवेदन देण्यात येणार आहे.
भिंगार छावणी परिषदेचा समावेश महापालिका हद्दीत करण्याबाबत केंद्र शासनाला पत्र पाठविले असून, त्यावर राज्य सरकारने छावणी परिषदेकडे विचारणा केली आहे. केंद्र व राज्य स्तरावर या हालचाली सुरु असताना सर्वसामान्य नागरिकांच्या भावना केंद्र व राज्य सरकारला कळविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शिवम भंडारी यांनी भिंगारमध्ये स्वाक्षरी मोहिम राबवली. यामध्ये चौका-चौकात व घरोघरी जावून नागरिकांच्या स्वाक्षर्या घेण्यात आल्या.
अहमदनगर शहराचा विकास होत असताना भिंगार छावणीच्या चटई क्षेत्रामुळे विकास खुंटला आहे. अनेक विकास कामे रेंगाळली जात आहे. नागरिकांना स्वत:ची जागा असताना चटई क्षेत्राच्या जाचक अटींमुळे इमारत बांधता येत नाही. रस्ते, पाणी, ड्रेनेज लाईनच्या समस्या गंभीर असल्याचे नागरिकांनी भावना व्यक्त करुन किमान महापालिकेच्या माध्यमातून मूलभूत सुविधा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली.
शिवम भंडारी म्हणाले की, छावणी हद्दीत आजही ब्रिटीश कालीन कायद्यामुळे नागरिक त्रस्त आहे.
शहरापेक्षा अधिक घरपट्टी व पाणीपट्टीचा कर भरुन देखील त्यांना सोयी-सुविधा नाही. चटई क्षेत्राच्या जाचक अटीमुळे भिंगारच्या अनेक नागरिक स्थलांतर होत आहे. गावात साधा एक पेट्रोल पंप नाही, अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी, आरोग्य व अस्वच्छता आदी प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. भिंगारचा महापालिकेत समावेश झाल्यास किमान विकासाला चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.