मंदिर परिसरात ट्रस्टचे पदाधिकारी व विश्वस्तांचा हलगीच्या निनादात जल्लोष
पेढे वाटून, फटाक्यांच्या आतषबाजीत आनंदोत्सव साजरा
अहमदनगर (प्रतिनिधी)- नागापूर, एमआयडीसी येथील रेणुका माता देवस्थानचे जुन्या ट्रस्टला धर्मदात आयुक्त पुणे यांनी मान्यता दिल्याचा आदेश प्राप्त होताच रेणुकामाता मंदिर परिसरात ट्रस्टचे पदाधिकारी व विश्वस्तांनी हलगीच्या निनादात जल्लोष केला.

प्रारंभी जुने ट्रस्टमधील पदाधिकारी विश्वस्तांच्या हस्ते मंदिरात देवीची आरती करण्यात आली. हलगीचा कडाडलेल्या निनादात जल्लोषाला प्रारंभ झाले. भाविकांसह विश्वस्तांनी एकमेकांना पेढे वाटून, फटाक्यांच्या आतषबाजीत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी अधिकृत ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष गोरख कातोरे, सचिव साहेबराव भोर, खजिनदार एकनाथ वाघ, विश्वस्त राजू भोर, दत्तात्रय विटेकर, एस.बी. कोतकर आदींसह विश्वस्त, भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागापूर, एमआयडीसी येथील रेणुका माता देवस्थानची सन 2002 मध्ये ट्रस्ट स्थापन करण्यात आली. या ट्रस्टमधील काही संचालकांनी बंडखोरी करून, 2019 साली नवीन ट्रस्टची स्थापना केली होती. जुने ट्रस्ट विरोधात नवीन ट्रस्टचा वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी धर्मदाय आयुक्तांकडे अध्यक्ष प्रभाकर भोर व विश्वस्त दत्तात्रय विटेकर यांनी दावा दाखल केला होता. याप्रकरणी अंतिम सुनावणीसाठी प्रकरण पुणे धर्मदाय आयुक्तांकडे पाठविण्यात आले. याप्रकरणी तीन वर्षे सुनावणी होऊन 24 मार्च रोजी पुणे धर्मदाय आयुक्तांनी मंदिराचे जुने ट्रस्टला मान्यता देऊन नव्याने स्थापन झालेल्या ट्रस्टची मान्यता नाकारली आहे.
याबाबत नवीन ट्रस्टची मान्यता रद्द करण्याचे आदेश अहमदनगर धर्मदाय आयुक्तांना दिले आहे. या निकालाची प्रत मंदिराच्या पदाधिकार्यांना प्राप्त होताच जल्लोष करण्यात आला. तसेच नवनागपूर गावात देखील मोठा जल्लोष उत्साहात पार पडला.