हजारोंच्या संख्येने पंचक्रोशीतील ग्रामस्थांची हजेरी
परमार्थामध्ये परीक्षा नसते, तर प्रदीर्घ प्रतिक्षा असते -ह.भ.प. संजय महाराज पाचपोर
अहमदनगर (प्रतिनिधी)- जीवन सोपे, मात्र परमार्थिक जीवन जगणे कठीण आहे. परमार्थामध्ये परीक्षा नसते, तर प्रदीर्घ प्रतिक्षा असते. परमार्थिक होण्यासाठी घराचे वातावरण देखील आनंदी व धार्मिक असले पाहिजे, असे प्रतिपादन रामायणाचार्य ह.भ.प. संजय महाराज पाचपोर यांनी केले.
निमगाव वाघा (ता. नगर) येथे सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण त्रितपपूर्ती सोहळा रंगला असून, हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या किर्तनप्रसंगी पाचपोर महाराज बोलत होते. याप्रसंगी साहेबराव बोडखे, ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, भागचंद जाधव, भाऊसाहेब जाधव, भाऊसाहेब ठाणगे, अतुल फलके, प्रमोद जाधव, कोंडीभाऊ फलके, गोरख फलके, श्याम जाधव, राम जाधव, सचिन कापसे, भरत बोडखे, बाळू फलके, नामदेव फलके, गोरख चौरे, गणेश जाधव, प्रकाश जाधव, गोकुळ जाधव, सुभाष जाधव, शंकर गायकवाड, दादाभाऊ गायकवाड, बापू सुंबे, रावसाहेब जाधव, मच्छिंद्र जाधव, नितीन चारुडे, शब्बीर शेख, सुखदेव जाधव, मच्छिंद्र कापसे, दिपक बोडखे, अरुण कापसे आदी उपस्थित होते.

पुढे पाचपोर महाराज म्हणाले की, गाथेमध्ये आपण कोठे आहोत, हे पाहण्यासाठी गाथा आहे. जन्मोजन्मी केलेल्या पुण्याने विठ्ठलाची कृपा मिळते. उसात रस आहे म्हणून त्याला पिळले जाते, सोन्याला चकाकी देण्यासाठी त्याला अधिक तापवले जाते, सुगंध देणार्या चंदनाचे झाड तोडले जाते अशी विशेष गुणधर्माचे दाखले देत त्यांनी ज्ञानी, संस्कारी व धार्मिक व्यक्तीची देखील समाज परीक्षा घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रामायणात भगवान हनुमानाची महत्त्वाची भूमिका त्यांनी विशद केली. तर मुलगीचा विवाह चांगल्या संस्कारी कुटुंबात व निर्व्यसनी युवकाशी करण्याचे त्यांनी आवाहन केले.
कीर्तनाच्या पैशातून शंभर गोशाळा चालविणारे व डायलिसिस रुग्णांना मोफत सेवा उपलब्ध करुन धार्मिक कार्यातून सामाजिक वसा घेतलेले अकोले येथील ह.भ.प. संजय महाराज पाचपोर यांचा ग्रामस्थांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. ह.भ.प. श्रीनिवास महाराज घुगे यांनी पाचपोर महाराज यांच्या कार्याची व निमगाव वाघा येथील त्रितपपूर्ती सप्ताहाची माहिती दिली. गावाच्या नवनाथ मंदिरात या धार्मिक सोहळ्याला प्रारंभ झाले असून, हे सप्ताहाचे 36 वे वर्ष आहे. दहा दिवस चालणार्या धार्मिक कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजेरी लावत आहे.