शहीदांच्या प्रेरणेने जाती-धर्मासाठी नव्हे, तर युवकांनी देश हितासाठी पुढे यावे -संतोष कानडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान युवा पिढीसाठी प्रेरणादायी व क्रांतिकारक आहे. जाती-धर्मासाठी नव्हे, तर युवकांनी देश हितासाठी पुढे येण्याची गरज आहे. हीच शहिदांना खरी मानवंदना ठरणार असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे जिल्हासचिव संतोष कानडे यांनी केले.
शहीद दिनानिमित्त अहमदनगर जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या वतीने पत्रकार चौकातील शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी कार्यकारिणी सदस्य वसंत शिंदे, ईश्वर भिंगारदिवे, सामाजिक कार्यकर्त्या संध्या मेढे, डाव्या चळवळीचे ज्येष्ठ नेते प्रा. कॉ. महेबुब सय्यद, कॉ. बहिरनाथ वाकळे, किसान सभेचे अॅड.कॉ. बन्सी सातपुते आदी उपस्थित होते.
पुढे कानडे म्हणाले की, देशाप्रती व सामाजिकस्तरावर काम करीत असताना, युवकांनी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचा आदर्श समोर ठेवून कार्य केले पाहिजे. देशातील युवा शक्तीने या महापुरुषांच्या विचार व प्रेरणेने कार्य केल्यास विकासात्मक क्रांती होणार असल्याचे त्यांनी सांगितले.