वारस नसलेल्या व्यक्तीला हॉस्पिटलमधून काढून केली जमिनीची खरेदी
ऑल इंडिया पँथर सेनेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- कोणीही वारसदार नसल्याचा फायदा घेत, उपचार घेणार्या व्यक्तीला हॉस्पिटलमधून काढून खरेदीखतावर अंगठा घेऊन राहुरी येथील जमीन नावावर करुन त्याचा मोबदला न देता फसवणूक करणार्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन पँथर सेनेचे शहर जिल्हाध्यक्ष अतुल भिंगारदिवे व पवन भिंगारदिवे यांनी पोलीस अधीक्षकांना दिले.
मौजे गुहा (ता. राहुरी) येथे गट नं. 321/2/1 ही महेश पाडुरंग कोळसे यांच्या वडिलोपार्जीत मालकीची जमीन आहे. त्याचे आई वडिल हे मयत असून, त्यांना भाऊ, बहिण नाही. ते एप्रिल 2022 मध्ये शहरातील एका खासगी हॉस्पिटलध्ये आयसीयूत उपचार घेत असताना त्यांना काही व्यक्तींनी आयसीयू मधून बाहेर काढले व सब रजिस्टार राहुरी येथे खरेदीखतावर अंगठा मारुन घेतला. त्यांची जमीन नावावर करुन देखील त्या जमिनीचा मोबदला त्यांना देण्यात आलेला नाही.

सदरील जमिनीचा व्यवहार 37 लाख 50 हजार रुपये मध्ये ठरलेला होता. महेश कोळसे यास खरेदी झालेल्या जमिनीचा कोणताही मोबदला देण्यात आलेला नाही. खरेदी घेणार्यांकडे कोळसे यांनी पैश्याची मागणी केली असता, समोरचे व्यक्ती हॉस्पिटलचे बिल आंम्ही भरल्याचे सांगून दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी देत आहे. मात्र हॉस्पिटलचे बिल कोळसे यांची आदर्श पतसंस्था राहुरी फॅक्टरी येथे असलेल्या ठेव रक्कमेतून अदा केल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
वास्तविक महेश कोळसे एकटे असल्याने त्याचा गैरफायदा घेऊन त्यांची जमीन विना मोबदला लाटण्याचा प्रयत्न सुरु आहे. जमिनीचा मोबदला न देता फसवणूक करणार्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.