• Mon. Dec 1st, 2025

जुनी पेन्शनसाठी कर्मचारी, शिक्षकांचे शहरात लाल वादळ घोंगावले

ByMirror

Mar 20, 2023

जिल्हाधिकारी कार्यालयावर मशाल घेऊन धडकला मोर्चा

किसान सभेच्या पदाधिकार्‍यांचा सहभाग

अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य करुन मुंबईला निघालेले शेतकर्‍यांचे वादळ शमलं, मात्र जुनी पेन्शनसाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अहमदनगर शहरातून सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर व परिचारिकांचे लाल वादळ घोंगावले. सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर महापालिका नगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायत कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने संपाच्या सातव्या दिवशी सोमवारी (दि.20 मार्च) जिल्हाधिकारी कार्यालयावर मशाल घेऊन मोर्चा काढण्यात आला. किसान सभेच्या पदाधिकार्‍यांनी या संपास पाठिंबा देऊन, मोर्चात सहभाग नोंदवला.


सावेडी येथील तहसिल कार्यालय येथे सर्व शिक्षक, कर्मचारींनी एकवटून मोर्चाला सुरुवात केली. हातात लाल झेंडे, गळ्यात लाल उपरणं व डोक्यावर लाल टोप्या घालून कर्मचारी वर्ग तर महिला लाल साड्या व ड्रेस परिधान करुन या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. मोर्चाच्या अग्रभागी धगधगती मशाल होती. एकच मिशन… जुनी पेन्शन! च्या जोरदार घोषणा देत रणरणत्या उन्हात प्रोफेसर चौक, गुलमोहर रोड मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. मोर्चाचे धरणे आंदोलनात रुपांतर होऊन यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.


या मोर्चा व आंदोलनात समन्वय समितीचे निमंत्रक रावसाहेब निमसे, सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, किसान सभेचे कॉ. बन्सी सातपुते, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, शिक्षक व शिक्षकेतर समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा. सुनील पंडित, जुनी पेन्शन संघटनेचे महेंद्र हिंगे, वैभव सांगळे, विनायक देशमुख, कॉ. महेबूब सय्यद, माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, शिरिष टेकाडे, खाजगी प्राथमिक संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल उरूमुडे, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बापू तांबे, शिक्षक परिषदेचे बाबासाहेब बोडखे, राज्य परिचारिका संघटनेच्या सुरेखा आंधळे, महाविद्यालयीन शिक्षकेतर संघटनेचे संतोष कानडे, भाऊसाहेब डमाळे, भाऊसाहेब थोटे, खाकाळ, नेटके मॅडम, नलिनी पाटील, भाऊ शिंदे, बाळासाहेब वैद्य, सयाजीराव वाव्हळ, पुरुषोत्तम आडेप, राजेंद्र लांडे, नंदकुमार हंबर्डे, फिरोज शेख, अ‍ॅड. सुधीर टोकेकर, विजय काकडे, धनंजय म्हस्के, नाना गाढवे, कल्याण ठोंबरे, अशोक आव्हाड, सुशील नन्नवरे, सचिन कोटमे, शिक्षकेतर संघटनेचे भानुदास दळवी, गोवर्धन पांडुळे आदी सहभागी झाले होते.


प्रारंभी शेतकर्‍यांच्या लाँग मार्चमध्ये हुतात्मा झालेले पुंडलिक जाधव यांना श्रध्दांजली वाहून आंदोलन सुरु करण्यात आले. संपा विरोधात भूमिका घेणारे आमदार संजय गायकवाड यांच्या निषेधाचा ठराव समितीचे निमंत्रक रावसाहेब निमसे यांनी मांडला. यावेळी आंदोलकांना संजय गायकवाड शेम शेम… च्या घोषणा दिल्या. तर निमसे यांनी शेतकरी, कर्मचारी, कामगार एकजुटीचा निर्धाराने संप यशस्वी होणार असल्याची भावना व्यक्त केली.


कॉ. बन्सी सातपुते म्हणाले की, कष्टकरी, शेतकरी, कामगारांच्या विरोधातील सरकार सत्तेवर आहे. सर्व शेतकर्‍यांचीच पोर आंदोलनात उतरलेली असून, या आंदोलनास किसान सभेचा पाठिंबा आहे. सरकारने उपकाराची भाषा करू नये, राज्यघटनेने दिलेला पेन्शनचा अधिकार हा त्यांचा हक्क आहे. त्यांना तो मिळाला पाहिजे. कामगारांना भविष्यात सन्मानाने जगता यावे, यासाठी पेन्शन त्यांचा आधार आहे. सुट्टे सुट्टे राहायचे दिवस संपले असून, एकजुटीने लढून पेन्शनचा हक्क मिळवावा लागणार आहे. तर शेतकर्‍यांच्या मालाच्या हमीभाव मिळण्यासाठी देखील हा लढा एकत्र पुढे घेऊन जाण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


कॉ. महेबूब सय्यद म्हणाले की, जाती-धर्माच्या नावाने समाजात फूट पाडून, राजकीय पोळी भाजण्याचे काम सरकार करत आहे. कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेत कर्मचार्‍यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र सरकार आपली जबाबदारी झटकून जुनी पेन्शन नाकारत असल्याचे त्यांनी सांगितले.


अविनाश घुले म्हणाले की, जुनी पेन्शनची मागणी सर्वांच्या हक्काची आहे. ताटातून ओढून घेण्याची सरकारची प्रवृत्ती झाली आहे. कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन नाकारली जात असून, कामगार कायदे मोडीत काढण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. कायम नोकरीचा विषय राहिलेला नाही, युवकांना पॅकेजप्रमाणे नोकरी देऊन कंत्राटीकरणाचे धोरण राबविले जात आहे. सरकार कामगार विरोधी व भांडवलदारांच्या बाजूने असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रमुख पदाधिकार्‍यांनी आपल्या भाषणात सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. आंदोलनाच्या शेवटी सरकारच्या बाह्य यंत्रणेमार्फत कंत्राटी कर्मचारी भरती करण्याचा शासन निर्णयाच्या पत्रकाची होळी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *