या शासन निर्णयाविरोधात आंदोलन आणखी तीव्र केले जाणार -बाबासाहेब बोडखे
अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शनसाठी सुरु असलेल्या बेमुदत संपाच्या तिसर्या दिवशी कंत्राटी कामगार भरती करण्यासाठी पॅनेल नियुक्ती करण्याच्या निर्णयाचा निषेध नोंदवून, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने मुंबई येथील आंदोलनात 14 मार्चच्या कंत्राटी कामगार नियुक्तीच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली.

जुनी पेन्शन साठी सुरू असलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर येथील आंदोलनात शिक्षक व शिक्षकेतर यांना मार्गदर्शन करताना शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे.हे आंदोलन शिक्षक परिषद मुंबई विभागाचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांच्या नेतृत्वाखाली झाले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली. तर या शासन निर्णयाविरोधात आंदोलन आणखी तीव्र केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कामगारांच्या हक्कावर गडांतर आणणारा हा अन्यायकारक निर्णय असल्याचे शिक्षक परिषदेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि कंत्राटी कामगार भरती बंद करून शिक्षण क्षेत्रातील कर्मचारी कपात रद्द करावी, अशी मागणी होत आहे. मात्र या निर्णयाने शासनाने कर्मचार्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
14 मार्चचा हा शासन निर्णय रद्द करावा, जुनी पेन्शन योजना लागू करावी, कंत्राटी कर्मचारी भरती रद्द करुन सरळ सेवा भरती करण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.
