• Sat. Mar 15th, 2025

समन्वय समिती व सरकारची जुनी पेन्शन प्रश्‍नी चर्चा निष्फळ

ByMirror

Mar 14, 2023

कर्मचारी संपावर ठाम

सर्व पर्याय धुडकावून जुनी पेन्शनचा आग्रह

अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शनच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि.14 मार्च) रोजी संपाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई येथे राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक विश्‍वास काटकर व सुकाणू समिती सदस्य यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारने दिलेला पर्याय धुडकावून जुनी पेन्शनवर समन्वय समिती ठाम असून, बैठकीत समन्वय समितीची मनधरणी व चर्चा अखेर निष्फळ ठरली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासूनच बेमुदत संपाला सुरुवात होणार असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.


या बैठकीत जुनी पेन्शनच्या मागणीचा पुनरुच्चार करण्यात आला. जुनी पेन्शन लागू करणे, हा सर्वात योग्य पर्याय असल्याचे मत संघटनेच्या वतीने ठामपणे मांडण्यात आले. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी संघटनेच्या मागणीला आमचा विरोध नाही, याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले. परंतु या संदर्भात सखोल अभ्यास होण्याची गरज आहे. अभ्यासाअंती अधिक पर्याय उपलब्ध होऊ शकतात त्यामुळे अभ्यास समितीचा प्रस्ताव संघटनेने स्वीकारण्याची अपेक्षा राज्य सरकारच्या वतीने व्यक्त करण्यात आली. यावर जुनी पेन्शन योजना राबविणे हा एकमेव पर्याय संघटनेस योग्य वाटत असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले. तर शासनाने दिलेला प्रस्तावाबाबत संघटनेच्या पदाधिकार्‍यांसह चर्चा करून पुढील कार्यवाही संबंधात विचार करण्याचे निमंत्रक विश्‍वास काटकर यांनी बैठकीत उत्तर दिले.


या बैठकीनंतर सर्व घटक संघटनांच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा झाली. या चर्चेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव स्वीकारला जाणार नसल्याचा निर्णय झाला. या बैठकीत समन्वय समितीचे निमंत्रक काटकर, शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष माजी आमदार भगवान आप्पा साळुंखे, मुंबई विभागाचे कार्यावाह शिवनाथ दराडे आदी उपस्थित होते. झालेली चर्चा निष्फळ व समितीने राज्य सरकारचा प्रस्ताव धुडकाविल्याने राज्य सरकारला कर्मचार्‍यांच्या संपाला सामोरे जावे लागणार असून, सर्वच कर्मचारी, शिक्षक जुनी पेन्शनसाठी आग्रही आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *