• Mon. Dec 1st, 2025

जनशिक्षण संस्थेत महिला दिन साजरा

ByMirror

Mar 8, 2023

व्यावसायिक प्रशिक्षणाने स्वत:चा व्यवसाय थाटलेल्या व त्यांना प्रशिक्षण देणार्‍या महिलांचा सन्मान

महिला आत्मनिर्भर झाल्यास समाजाचा विकास -गणेश कवडे

अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला व युवती आत्मनिर्भर झाल्यास समाजाचा विकास साधला जाणार आहे. महिलांमध्ये विविध कौशल्य असतात, मात्र आत्मविश्‍वास नसल्याने त्यांना पुढे जाता येत नाही. जनशिक्षण संस्था महिला व युवतींमधील कौशल्य विकसीत करुन त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण करत आहे. महिलांपुढे कोणतीही गोष्ट अशक्य नाही, समाज व कुटुंबाचा पाया महिलांवर आधारलेला असल्याचे प्रतिपादन मनपा स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे यांनी केले.


भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय (नवी दिल्ली) संचलित शहरातील जनशिक्षण संस्थेत महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या माध्यमातून व्यावसायिक प्रशिक्षणाने स्वत:चा व्यवसाय थाटलेल्या व त्यांना प्रशिक्षण देणार्‍या महिलांचा सन्मान पार पडला. यावेळी कवडे बोलत होते. याप्रसंगी जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त एन.एन. सूर्यवंशी, कार्यक्रम अधिकारी विजय पंतम, सहाय्यक फौजदार गीता कळमकर, संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार, कार्यक्रम सल्लागार समिती सदस्य कमल पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


प्रास्ताविकात बाळासाहेब पवार म्हणाले की, जनशिक्षण संस्थेत वर्षभर महिलांचा सन्मान करून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रेरणा दिली जाते. महिलांना समाजात मान सन्मान मिळवून देण्यासाठी जन शिक्षण संस्था कार्य करत आहे महिला सक्षम झाल्यास कुटुंबाची प्रगती साधली जाणार असल्याचे सांगून त्यांनी महिला दिनाची पार्श्‍वभूमी व इतिहास सांगितला.


प्रारंभी सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमात गृहिणी ते प्रशिक्षिका व सध्या उद्योजिका ठरलेल्या नाझीया शेख यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्याचब्रोबर संस्थेतील प्रशिक्षिका ममता गड्डम, मंगल चौधरी, माधुरी घाटविसावे, पूजा तागडकर, कल्पना पठारे, शितल दळवी, कल्याणी जायभाय, शुभांगी देशमुख, उषा देठे यांचा सन्मान करण्यात आला. तर व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण करणार्‍या महिला व युवतींना यावेळी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.


गीता कळमकर म्हणाल्या की, स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यात जीवनाचा खरा आनंद आहे. यामुळे स्वतःची एक ओळख निर्माण होते. यशस्वी महिलांनी स्वतःचे कौशल्य विकसित करुन यश मिळवले. कौशल्याचा व्यवसायात रूपांतर केल्यास यश देखील मिळते. महिलांना सहानुभूती नको तर समानुभूती हवी आहे. स्त्री-पुरुष समानता आणण्यासाठी महिलांनी देखील भावी पिढीवर संस्कार रुजवण्याचे त्यांनी सांगितले.


एन.एन. सूर्यवंशी यांनी ज्यांच्याकडे अर्थ नाही, त्यांचे आयुष्यही अर्थहीन बनते. कौशल्यातून अर्थप्राप्ती करता येते. कौशल्याला अद्यावत तंत्रज्ञानाची जोड देऊन महिलांनी स्वत:चा व्यवसाय विस्तारण्याचे त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कुंदा शिंदे यांनी केले. आभार कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद यांनी मानले. कार्यक्रमासाठी लेखापाल अनिल तांदळे, विजय बर्वे आदींसह जन शिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थी महिला व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *