• Wed. Nov 5th, 2025

दिल्लीगेट वेस येथून गीताभारत राष्ट्रीय मतकारण महाजागर सुरू

ByMirror

Mar 5, 2023

सत्तापेंढारींना पायउतार करण्यासाठी इंडिया अगेन्स्ट तमस स्लेव्हरी संघटनेचा पुढाकार

अहमदनगर (प्रतिनिधी)- आमीष दाखवून व जातीच्या नावाने मतं घेऊन निवडून आलेल्या सत्तापेंढारींना सत्तेतून कायमचे पायउतार करण्यासाठी इंडिया अगेन्स्ट तमस स्लेव्हरी संघटनेच्या वतीने शहरातील दिल्लीगेट वेस येथून गीताभारत राष्ट्रीय मतकारण महाजागर सुरू करण्यात आले. संबळाच्या निनादात कार्यकर्त्यांनी यावेळी जय शिवाजी… जय डिच्चू कावा! आणि जय गीताभारत… अशा घोषणा दिल्या.


या महाजागर अभियानात अ‍ॅड. कारभारी गवळी, रईस शेख, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, कैलास पठारे, यमनाजी म्हस्के, ओम कदम, वीरबहादुर प्रजापती, गोविंद जायभाय, मुकेश शिंदे, बळीराम पाटोळे, नंदा साबळे, कारभारी वाजे, अशोक सरोदे, किशोर शेरकर आदी सहभागी झाले होते.
स्वतंत्र्योत्तर गेल्या 30 ते 35 वर्षात सत्तापेंढार्‍यांनी धर्म, जात आणि पैसा, कोंबड्यांचा वापर करून मतदारांना जोंधळ्याची शपथ देऊन मतकारण भ्रष्ट केले. त्यातून मागच्या दाराने सत्ता मिळवलेल्या राजकारण्यांनी देशाची तिजोरी लुटून घरी नेली. त्यामुळे देशात बेकारी वाढली, झोपडपट्ट्या वाढल्याने बेघरांना भूमीगुंठा नाही. स्त्रियांवरील अत्याचार वाढले, त्याशिवाय अनेक प्रश्‍न देशभर सुरू राहिले आहेत. यासाठी यापुढे घराघरात आणि देशभरात राजकारणाबरोबरच राष्ट्रीय मतकारण करण्याची गरज असल्याची भूमिका आंदोलकांनी यावेळी मांडली.


गीताभारत धर्मग्रंथ नाही, तर निरंतर राष्ट्रीय कर्तव्य योगाची क्रांतिकारक शिकवण आहे. गेल्या हजार वर्षात गीताभारताला पोथी, पूजा, कर्म करणे यामध्ये गुंतवून ठेवण्यात आले. यामध्ये भक्ती मार्ग विस्तारीत झाला. परंतु कुरुक्षेत्रावरील रणभूमीवर सांगितलेला कर्तव्ययोग भारतीय जनता विसरली, त्यामुळे गीताभारतातील कर्तव्य योगाच्या मदतीनेच मतदारांमध्ये मतकारण महाजागर करण्याची वेळ आली आहे. यामुळे डिच्चूकावा या लोकास्त्राचा वापर सर्रास होणार आहे. त्यातून लोकांबद्दलची आस्था, राष्ट्राबद्दलची भक्ती आणि लोकांचे प्रश्‍न सोडविण्याचे तंत्र निरंतर राष्ट्रीय कर्तव्य करणार्‍या उमेदवारालाच मतदारांनी मतदान करा आणि स्वातंत्र्याची फळे आपल्या पदरात पाडून घ्यावी. पुण्याचा कसबा मतदारसंघात मतकारण महाजागर यशस्वी झाले असल्याचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी स्पष्ट केले.


भारतीय संविधानाला गीताभारतासारख्या धर्मनिरपेक्ष ग्रंथाची जोड दिल्याशिवाय, देशात नैतिक पातळी मोठ्या प्रमाणात वाढू शकणार नाही. देशातील भ्रष्टाचार, अनागोंदी, टोलवाटोलवी कायमचे संपविण्यासाठी गीताभारता शिवाय पर्याय नाही. स्वतःच्या उन्नतीसाठी तमस चेतना टाकून उन्नत चेतना स्वीकारण्याचा आग्रह गीताभारत सातत्याने करीत असल्याचे वीरबहादूर प्रजापती यांनी सांगितले.


यावेळी राष्ट्रीय कर्तव्यामध्ये कसुर नको, अशी गीता भारताची भूमिका आहे. या अभियानाद्वारे मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांना गीताभारत राष्ट्रीय मतकारण महाजागर समजवून सांगण्यात आले. तर देशाच्या प्रगतीसाठी व लोकशाहीच्या असतित्वासाठी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *