• Sat. Sep 20th, 2025

पी.ए. इनामदार स्कूलमध्ये मराठीचा जागर

ByMirror

Feb 28, 2023

नाटिका, भाषणे व कवितेतून मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा

मराठी भाषा हा मराष्ट्रातील जनतेचा सांस्कृतिक ठेवा -प्राचार्य हारून खान

अहमदनगर (प्रतिनिधी)- इकरा एज्युकेशन अ‍ॅण्ड वेलफेअर सोसायटी संचलित मुकुंदनगर येथील पी.ए. इनामदार स्कूलमध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी या काव्य पंक्तीने सुरु झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मराठीची थोरवी सांगणारे भाषणे सादर केली.


नाटिका व कवितेतून विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा जागर केला. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष अब्दुल रहीम खोकर, प्राचार्य हारून खान, उपप्राचार्या फराना शेख आदींसह शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मराठमोळी वेशभुषा परिधान करुन आलेल्या विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. प्रास्ताविकात उपप्राचार्या फराना शेख यांनी विद्यार्थ्यांना मराठी राजभाषा दिनाचे महत्त्व सांगून, मातृभाषेची माहिती दिली.


प्राचार्य हारून खान म्हणाले की, मराठी भाषा हा मराष्ट्रातील जनतेचा सांस्कृतिक ठेवा आहे. या मातृभाषेचा न्यूनगंड न बाळगता त्याचा पुरस्कार करण्याची गरज आहे. मराठी राजभाषा दिनी सर्वांना मायमराठीची आठवण येते. विचारांची देवाण-घेवाण व भावना समृध्द असलेल्या या भाषेला वैभवाच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी सर्वांच्या योगदानाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


संस्थेचे अध्यक्ष अब्दुल रहीम खोकर म्हणाले की, शाळेत जागतिक इंग्रजी भाषेतून शिक्षण दिले जात असले, तरी मराठीची गोडवी कमी झालेली नाही. शाळेत मराठी भाषा देखील तेवढ्याच प्रगल्भतेने शिकवली जात आहे. जागतिक भाषेचा स्विकार करताना, प्रादेशिक संस्कृती जपण्यासाठी मातृभाषेचा देखील तेवढाच अभिमान प्रत्येकाला असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *