कै. सुनील गोपीनाथ वायकर फिरता करंडक महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाने पटकाविला
सामाजिक, राजकीय व सशक्त भारताबद्दल विद्यार्थी झाले बोलते
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगावला पार पडलेल्या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा 2023 मध्ये, शालेय विद्यार्थी सामाजिक, राजकीय व सशक्त भारताबद्दल बोलते झाले. सध्याच्या विविध प्रश्नांना हात घालून विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्वाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
सरस्वती एज्युकेशन सोसायटी संचलित उदयनराजे’स गिगाबाईट कॉम्प्युटर केडगावच्या वतीने स्व. सुनील गोपीनाथ वायकर यांच्या स्मरणार्थ आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. केडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत पार पडलेल्या या स्पर्धेत केडगाव मधील सर्व माध्यमिक शाळांमधील शालेय विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त सहभाग लाभला.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, महाराष्ट्र राज्य टंकलेखन संगणक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे अहमदनगर जिल्हा समन्वयक गणेश आठरे, उद्योजक हौशीराम सातपुते, लर्निंग हबचे श्रीकांत कुलांगे, उद्योजक पोळ, मुख्याध्यापक संतोष गवळी, जि.प. प्राथमिक केंद्र शाळा मुख्याध्यापक कोठुळे मॅडम, पुणे विद्यापीठ सिनेट प्रतिनिधी अमोल घोलप, श्रीमती अनिता सुनील वायकर, कोमल बाबासाहेब वायकर, सौ मंदा रावसाहेब भालेकर आदींसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

प्रास्ताविकात गिगाबाईट कॉम्प्युटरचे संस्थापक संचालक बाबासाहेब वायकर म्हणाले की, आमच्या संस्थेचे मार्गदर्शक वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मा. कार्यकारी संचालक जे.आर. पवार व व्याख्याते गणेश शिंदे या दोघांच्या मार्गदर्शनातून कोरोना काळामध्ये स्वर्गवासी झालेले संस्थेचे संचालक कै. सुनील गोपीनाथ वायकर यांच्या स्मरणार्थ, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व उत्तम वक्ता घडण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे म्हणाले की, विषयाचे आकलन करून ,साचेबद्ध पद्धतीने विचार मांडल्यास प्रभावी वक्तृत्व निर्माण होते. वक्तृत्वला धार मिळण्यासाठी वाचन आवश्यक आहे. विषय समजून घेऊन शब्दांची योग्य मांडणी केल्यास वक्तृत्व बहरत असल्याचे सांगितले. प्रकाश कराळे म्हणाले की, गिगाबाईट कॉम्प्युटरच्या वायकर परिवारातील दोन भावंडांमधील म्हणजेच राम लक्ष्मणाचे प्रेम आहे. या प्रेमापोटी भावाच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांमधून उत्तम वक्ता घडविण्यासाठी अशा स्पर्धांचे उपक्रम कौतुकास्पद आहे. श्रोत्यांना प्रभावित करून आपले विचार पटवून देण्याचे कौशल्य वकृत्व करीत असते. बोलणारा विद्यार्थी जीवनात यशस्वी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
स्पर्धेचे परीक्षण सो.स. महाजन शेतकी प्रशाला मांडवगण या विद्यालयाचे इंग्रजी विषयाचे तज्ञ श्री हरिश्चंद्र दळवी यांनी व चास येथील श्री नृसिंह विद्यालयाचे मराठी विषयाचे तज्ञ शिक्षक सुंबे सर यांनी केले. स्पर्धेसाठी स्वामी विवेकानंदांच्या दृष्टिकोनातून भारत, स्वराज्य उभारणीत जिजाऊंचे योगदान, महिला सबलीकरण व सद्य परिस्थिती, ज्ञान-विज्ञान तंत्रज्ञानातील भारताची भरारी, भारतीय लोकशाही व सद्य राजकीय परिस्थिती हे विषय देण्यात आले होते.
या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक- महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाने पटकाविला, शाळेच्या वतीने इयत्ता 10 वी. ची विद्यार्थिनी कुमारी पायल संजय कोतकर हिने प्रतिनिधित्व केले. द्वितीय क्रमांक एस.एस. मोहिते विद्यालयाने मिळविला, शाळेचे प्रतिनिधित्व इ.9 वी ची विद्यार्थिनी कुमारी वर्षा यादव हिने केले. तर तृतीय क्रमांक- सरस्वती विद्यालयाला मिळाला, शाळेचे प्रतिनिधित्व इ. 9 वी ची विद्यार्थिनी प्रियंका दत्तू गोल्हार हिने केले. विजेत्या स्पर्धकांना पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना पदक, शिवचरित्र, औषधी वनस्पती आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
