विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन
एकाच ईश्वराची सनतान असलेले सर्व धर्मिय आपआपसामध्ये बंधू -डॉ. रफिक सय्यद
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर सोशल असोसिएशन संचलित मुकुंदनगर येथील डॉ. जाकीर हुसेन मराठी प्राथमिक शाळा व मोहम्मद अल्ताफ इब्राहिम माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. सावेडी येथील माऊली सभागृहात झालेल्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी देशभक्ती, धार्मिक गीतांसह सांस्कृतिक कार्यक्रमातून देशातील विविध संस्कृतीचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कव्वालीने उपस्थितांची मने जिंकली. चिमुकल्यांच्या बहारदार नृत्याच्या कलाविष्काराला उपस्थित पालक व प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रफिक सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी उद्योजक डॉ. अविनाश मोरे, महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघाचे कर्णधार अझीम काझी, वसिम हुंडेकरी, गजेंद्र भांडवलकर, प्राचार्य रुपनर, संस्थचे अध्यक्ष शाहीद काझी, सचिव रेहान काझी, संचालिका डॉ. आस्मा काझी, फैय्याज शेख, मिसगर एज्युकेशन बोर्डचे इनाम खान, ढवळपुरी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक बापुसाहेब रुपनर, ढवळपुरी प्राथमिकचे मुख्याध्यापक संदीप महांडुळे, आयझॅक इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य सचिन जाधव, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक समिउल्ला शेख, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एजाज शेख आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. रफिक सय्यद म्हणाले की, शिक्षण हे सुसंस्कारी असले पाहिजे. अन्यथा समाजात उच्च शिक्षित माणसे भ्रष्टाचार करुन एकमेकांची लुट करत आहे. कुरान हा संपूर्ण मानवजातीला बंधुभाव व समतेचा संदेश देतो. सर्व एकाच ईश्वराची सनतान असल्याने सर्व धर्मिय आपआपसामध्ये बंधू आहेत. ज्यांना जीवनाचा उद्देश कळाला नाही, ते मनुष्य नाही. अशा व्यक्तींपासून समाजाला अधिक धोका आहे. शिक्षणाला संस्काराची जोड दिल्यास समाजाचा विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. अविनाश मोरे यांनी अल्पसंख्यांक समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अहमदनगर सोशल असोसिएशन देत असलेल्या योगदानाचे कौतुक केले. पाहुण्यांचे स्वागत शाहिद काझी यांनी केले.
प्रास्ताविकात रेहान काझी यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर करुन, वाढत्या गुणवत्तेचा आलेख मांडला. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी राबविण्यात येणार्या उपक्रमाची माहिती दिली. प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष स्व. डॉ. सईद काझी यांच्या जीवनावर माहितीपट दाखवून त्यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाची माहिती देण्यात आली. यावेळी कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध स्पर्धेत नैपुण्य मिळवणार्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून वाढते प्रदुषण, अस्वच्छता व स्त्री भ्रुणहत्या रोखण्यासाठीचा सामाजिक संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिना शेख व जाविद पठाण यांनी केले. आभार समिउल्ला शेख यांनी मानले. यावेळी शालेय शिक्षिका अर्शिया हवालदार, बाळासाहेब चौधरी, सुरेखा ससे, मेहरुना शेख, आसिया शेख, तब्बसुम शेख, अंजुम इनामदार, नर्गिस खान, तनाज शेख, इंगळे मॅडम, शब्बीर शेख, सईद शेख आदी उपस्थित होते.

