डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व शिवसेना मदत वैद्यकिय कक्षाची प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन
पारा गोठवणार्या थंडीत विद्यार्थ्यांसाठी निर्णय घेण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात वाढत्या कडाक्याच्या थंडीमुळे सकाळच्या सत्रात भरणार्या शाळांची वेळ उशीराने करण्याची मागणी डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व शिवसेना मदत वैद्यकिय कक्षाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी शिवसेना (बाळासाहेबांची) जिल्हा संपर्क प्रमुख तथा मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे रणजीत परदेशी, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत (काका) शेळके, शहर प्रमुख अनिकेत कराळे, तारीक कुरेशी आदी उपस्थित होते.
सध्या राज्यसह शहरात थंडीची तीव्र लाट सुरू आहे. शासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले जात आहे. अशा परिस्थितीत सकाळच्या सत्रात सकाळी लवकर उठून विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत आहे. पारा गोठवणार्या थंडीत विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारे शारीरिक हानी होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
थंडीची तीव्रता लक्षात घेऊन शहरासह जिल्ह्यात सकाळच्या सत्रातील शाळा एक ते दीड तास उशिराने भरवण्याची मागणी शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे. याबाबत तातडीने निर्णय घेऊन सर्व शाळांना आदेशित करण्याचे म्हंटले आहे.
