• Sat. Mar 15th, 2025

सावेडीतील त्या हॉस्पिटलच्या पार्किंगप्रश्‍नी शहर वाहतूकशाखेत बैठक

ByMirror

Dec 5, 2022

स्थानिक नागरिकांच्या तक्रारीची दखल

अन्यथा कारवाईचा बडगा उगारण्याचा पोलीसांचा इशारा

अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडीतील गायकवाड कॉलनी, अर्बन बँक कॉलनी व लॉयड कॉलनी परिसरात असलेल्या त्या सात मोठ्या हॉस्पिटमुळे होणार्‍या वाहतूक कोंडीच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी (दि.5 डिसेंबर) शहर वाहतूक शाखेच्या वतीने हॉस्पिटल प्रशासन व स्थानिक नागरिकांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकित शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी या भागात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून सर्व हॉस्पिटलने पार्किंगचे योग्य नियोजन करुन, रुग्णांच्या नातेवाईकांची वाहने रस्त्यावर लागणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. येत्या सात दिवसात नियोजन न झाल्यास कारवाई करण्याचे देखील त्यांनी या बैठकित इशारा दिला.


गायकवाड कॉलनी, अर्बन बँक कॉलनी व लॉयड कॉलनी भागातील नागरिकांना या परिसरात असलेल्या हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांची वाहने, रुग्णांच्या नातेवाईकांची वाहने रस्त्यावर उभे असल्याने वारंवार वाहतूक कोंडी, होणारे लहान-मोठे अपघात व इतर त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले होते.

या प्रश्‍नाची तातडीने दखल घेऊन पोलीस अधीक्षक ओला यांनी शहर वाहतुक शाखेला हॉस्पिटल प्रशासन व स्थानिक नागरिकांची संयुक्त बैठक घेण्याचे निर्देश दिले होते. यासंदर्भात पत्रकार चौकातील शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात ही बैठक सोमवारी पार पडली. यावेळी स्थानिक नागरिकांच्या वतीने शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख आनंद लहामगे, अ‍ॅड. संजय दुशिंग, अ‍ॅड. व्हि.के. पंडित, अतुल मांजरे, गुलशन बोरा, कुलभूषण तोरडमल, कुलदीप तोरडमल आदींसह हॉस्पिटलचे प्रतिनिधी व डॉक्टर यावेळी उपस्थित होते.


हॉस्पिटलमध्ये येणार्‍या रुग्णांच्या नातेवाईकांची वाहने रस्त्यावर लागत असल्याने स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडीच्या गराड्यातून वाट काढत जाणे अवघड होत आहे. विद्यार्थी, वयस्कर लोक व कार्यालयीन कर्मचारी यांना घराबाहेर जाणे व परत येणे अवघड होऊन बसले असल्याचा प्रश्‍न स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला. हॉस्पिटलच्या प्रतिनिधींनी देखील यावर तातडीने उपाययोजना करुन स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *