• Tue. Oct 28th, 2025

शेंडी येथील दगडफेक व मारहाण प्रकरणातील आरोपींना उच्च न्यायालयाकडून जामीन

ByMirror

Nov 25, 2022

गणेशोत्सवात दोन गटात झाले होते भांडण

अहमदनगर (प्रतिनिधी)- शेंडी (ता. नगर) गावात गणेशोत्सवात गौराईचे पूजन होत असताना, दोन गटात झालेली दगडफेक व मारहाणीत खूनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपात अटक असलेल्या आरोपींना औरंगाबाद उच्च न्यायालयातून नुकताच जामीन मिळाला आहे.


एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे या गुन्ह्यात पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली होती. या गुन्ह्यात खूनाचा प्रयत्न केला, असा आरोप असल्यामुळे जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन नामंजूर केला होता. शेंडी गावातील गटातटाच्या राजकारणातून दोन गटात भांडण झाले. सदर घटनेचे रूपांतर दगडफेक मध्ये झाली. या गावाजवळ असलेल्या लक्ष्मी माता मंदिरावर दगडफेक झाली व तेथे असलेल्या राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचे देखील तोडफोड करण्यात आली होती. त्यामुळे परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. या गोंधळात तलवार, लोखंडी रॉड व दांडक्यांनी पाच जणांना जखमी केले असा गंभीर आरोप पोलीस स्टेशनला करण्यात आलेला होता.


घटनेत पोलिसांनी अटक केलेले विकी उर्फ विकास रावसाहेब नेटके व संजय राजाराम घोरपडे यांचा जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन अर्ज नामंजूर केल्यानंतर, त्या दोघांनी अहमदनगर येथील अ‍ॅड. सरिता एस. साबळे यांच्या वतीने औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयात आरोपीच्या वतीने बाजू मांडताना अ‍ॅड. साबळे यांनी युक्तिवाद करत गुन्हा हा राजकारणातून घडला.

परस्परविरोधी तक्रारी झालेल्या आहे. तसेच जखमी यांना झालेल्या जखमा या खूनाच्या प्रयत्नातून झालेल्या नाहीत, तसेच ते गंभीर स्वरूपाच्या नाहीत. असे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. हा युक्तिवाद ग्राह्य धरून उच्च न्यायालयाने दोन्ही आरोपी नेटके व घोरपडे यांचा जामीन मंजूर केला. आरोपीतर्फे अ‍ॅड. सरिता एस. साबळे व अ‍ॅड. सतीश परमेश्‍वर गीते यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *