स्थानिक नगरसेवकांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन
अपघात टाळण्यासाठी व नागरिकांच्या सोयीसाठी भुयारी मार्गाची गरज
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील नागरिकांच्या सोयीसाठी व अपघात टाळण्यासाठी केडगाव वेस ते देवी रोडला जोडणारा भुयारी मार्ग करण्याची मागणी नगरसेविका लताताई शेळके, गौरीताई ननावरे व नगरसेवक राहुल कांबळे यांनी रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

शहरातील उड्डाणपूलाच्या उद्घटनानिमित्त नगरला आलेले केंद्रीय मंत्री गडकरी यांची सदरील नगरसेवकांनी भेट घेऊन भुयारी मार्गाबाबत लक्ष वेधले. शहराच्या विस्तारामुळे केडगाव वेस ते देवी मंदिर रोड या रस्त्याचा वापर वाढलेला आहे. हा रस्ता सर्वात जास्त वाहतुकीसाठी वापरणार्या रस्त्यांपैकी एक झाला आहे. या रस्त्यालगत असलेल्या प्रभाग क्रमांक 17 मधील हरिजन वस्ती, कोतकर मळा, मोहिनीनगर, शास्त्रीनगर, केडगाव देवी तसेच देवीच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांना नगर-पुणे महामार्गाच्या वाहतुकीमुळे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. तर यामुळे अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे. केडगाव वेस ते देवी रोडला जोडणार्या मार्गावर भुयारी मार्ग करण्यात यावी अशी या भागातील नागरिकांची वारंवार मागणी होत आहे. केडगाव परिसरातून जाणारा नगर-पुणे हा राज्यमार्ग मोठ्या वरदळीचा झाला आहे. बरेचसे महाविद्यालय हे केडगावमध्ये असल्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना तासंतास ताटकळत उभे रहावे लागत आहे. तर हॉस्पिटलमध्ये तातडीने रुग्ण घेऊन जाणे अवघड होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या सर्व प्रश्नांचा विचार करून सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घ्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी नगरसेवकांना बर्याच वेळा केलेली आहे. रस्ता ओलांडताना अपघात होऊ नये, म्हणून विद्यार्थी, जेष्ठ नागरिकांची मोठी दमछाक होते. भुयारी मार्ग सुरू केल्यास विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. नगर-पुणे रस्ता हा नॅशनल हायवे असल्यामुळे स्पीड ब्रेकर बसविता येत नसल्याबाबत बांधकाम खात्याने या आधीच आपला हात वर केला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
या रस्त्यावर सततची असणारी ट्रॅफिक, या भागातील विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी व अपघात टाळण्यासाठी केडगाव वेस ते देवी रोडला जोडणारा भुयारी मार्ग होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याला सूचना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने नगरसेवकांनी केली आहे.

