रस्ता बंद केल्याने उपचारा अभावी म्हैस दगावली
रस्ता अडवून जीवे मारण्याची धमकी देणार्यावर कारवाई व्हावी
अहमदनगर (प्रतिनिधी)- वहिवाटीचा रस्ता अडवून जीवे मारण्याची धमकी देणार्याची तक्रार दरेवाडी (ता. नगर) येथील शेतकरी गोरख दामू ससे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तर रस्ता बंद केल्याने उपचारा अभावी म्हैस दगावली असून, त्याची विल्हेवाट लावणे, इतर म्हशींना डॉक्टर बोलावून उपचार देणे व जीवन जगणे अवघड झाले असल्याने सदरील रस्ता रहदारीसाठी मोकळा करुन देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
गोरख ससे यांची दरेवाडीला वडिलोपार्जित जमीन आहे. तुक्कडओढा लगत सर्व्हे नंबर 115 मध्ये त्यांचा हिस्सा असून, ते या मिळकतीमध्ये कुटुंबीयांसह राहत आहे. शेतीसह त्यांचा दुग्ध व्यवसाय सुरु असून, यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. सर्वे नंबर 115 मधील वस्तीवर व शेतात जाण्या येण्यासाठी दरेवाडी-निंबोडी पूर्वपार चालत आलेल्या शिव रस्त्याचा वापर वहिवाटीकरिता सुरु आहे. शासनाच्या निधीतून सदर रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली असून, तो चांगल्या प्रकारे तयार करण्यात आलेला आहे. या रस्त्याबाबत दिवाणी न्यायालयात दावा न्यायप्रविष्ठ आहे. असे असताना येथील रहिवासी दत्तात्रय बेरड जाणीवपूर्वक सदरचा रस्ता रहदारीसाठी बंद करण्यासाठी खोडसाळपणाने रस्ता खोदत असल्याचा आरोप ससे यांनी केला आहे.

ससे यांची म्हैस आजारी पडली असताना रस्त्या अभावी वेळेत उपचार न मिळाल्याने ही म्हैस दगावली आहे. रस्ता बंद केल्याने उपचार करण्यासाठी डॉक्टरांना देखील येऊ देण्यात आले नाही. तर मेलेल्या म्हशीची विल्हेवाट लावणे रस्त्याभवी अशक्य झाले असून, ती तशीच जागेवर पडून आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटलेली आहे. इतर म्हशी देखील आजारी पडत असून, दवाखान्यात घेऊन जाणे व डॉक्टरला बोलावणे अशक्य बनले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात येऊन जीवण जगणे अवघड झाले असल्याचे ससे यांनी निवेदनात म्हंटले आहे.