महिलेने दुर्गेचे रूप धारण करताच धक्कादायक प्रकार उघडकीस
महिना उलटून देखील पार्सल पाठविल्याच नसल्याचा प्रकार उघड
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील माळीवाडा भागातील त्या कुरियरवाल्याची बनवाबनवी एका महिलेने दुर्गारुप धारण करताच उघडकीस आली. घेतलेले पार्सल महिना उलटून देखील दिलेल्या पत्त्यावर न पाठविता दुकानातच ठेवल्याचा प्रकार पार्सलचे ट्रॅक डिटेल्स तपासल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली.
माळीवाडा वेस येथील एका कुरियर चालकाकडे 30 ऑगस्ट रोजी एका महिलेने औषधी तेलाचे पार्सल संगमनेरला पाठविण्यासाठी दिले होते. मात्र दिलेले कुरियरचे पार्सल संबंधित व्यक्तींकडे महिना उलटूनदेखील पोहचले नसल्याने त्या महिलेने वारंवार कुरियर चालकाकडे चकरा मारुन विचारणा केली. आज-उद्या सदर पार्सल संबंधितांना मिळणार असल्याचे त्या गोडबोल्या कुरियर चालकाने आश्वासने दिली. मात्र शेवट पर्यंत सदर पार्सल संगमनेरला पोहचला नसल्याने महिलेने संबंधित कुरियर चालकाला फोन लावण्यास सुरुवात केली. तरी देखील त्या गोडबोल्या कुरियर चालकाने पुन्हा आश्वासनांची खैरात केली.
शेवटी त्या महिलेचा संयमाचा बांध फुटला, महिलेने थेट माळीवाडा वेस येथील कुरियर चालकाचे दुकान गाठून दिलेले पार्सल परत करण्याची मागणी केली. कर्मचार्यांनी देखील तो पार्सल देण्यास असमर्थता दर्शवली. महिलेने कुरियर मालकाला फोन करण्यास सुरुवात केली असता, त्याने फोन उचलण्याचे बंद केले. त्या महिलेने दुर्गारुप धारण करताच कर्मचार्यांनी चक्रे फिरली, कर्मचार्यांनी संगमनेरला पाठविण्यासाठी दिलेला पार्सल त्या दुकानातूनच शोधून काढला. मात्र त्याची मोठी दुरावस्था झाली होती.
महिलेने कर्मचार्यांकडे ते पार्सल पाठवल्याचे ऑनलाइन डिटेल्स चेक केले असता, पार्सल पाठविण्यात आले नसल्याचे उघडकीस आले. पुन्हा तो गोडबोल्या कुरियर चालक माफी मागून नुकसान भरपाई देण्याचे बोलू लागला. मात्र महिनाभर बनवाबनवी करणार्या त्या कुरिअरचालकामुळे महिलेला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
माळीवाडा वेस येथील त्या कुरियर चालकाच्या अनेक तक्रारी असून, अनेकांचे महत्त्वाचे कागदपत्र व पार्सल त्याने गहाळ केल्याचे परिसरातील नागरिकांकडून बोलले जात आहे.