इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम आंदोलनाच्या वतीने जालिंदर चोभे यांचे दोन दिवसीय लाक्षणिक उपोषण
अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय राज्यघटनेसह लोकशाही वाचवण्यासाठी महात्मा गांधी जयंती निमित्त इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम आंदोलनाच्या वतीने जालिंदर चोभे मास्तर यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर दोन दिवसीय लाक्षणिक उपोषण करुन ईव्हीएम मशीन विरोधातील माहिती पत्रक वाटली.
या आंदोलनाच्या माध्यमातून चोभे यांनी देशातील सर्व निवडणुका ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलट पेपरवर घेण्याची मागणी केली. 2019 च्या निवडणुकीत ईव्हीएम मशीन घोटाळ्याचे अनेक गैरप्रकार समोर आले होते. ईव्हीएम मशीन हा लोकशाहीला गिळंकृत करणारा राक्षस ठरत आहे. 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत ईव्हीएम राक्षस मते कमी-जास्त करणार. यासाठी ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेणे आवश्यक असल्याचे जालिंदर चोभे यांनी म्हंटले आहे.
ईव्हीएम विरोधी चळवळ राबवून भारतीय राज्यघटनेसह लोकशाही वाचवण्याचा लढा सुरू असून, बॅलेट पेपरवर सर्व निवडणुका होण्यासाठी नागरिकांना या जनआंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन चोभे यांनी केले.