• Sat. Mar 15th, 2025

एक तास राष्ट्रवादीसाठी उपक्रमातंर्गत झालेल्या बैठकीत शहर व राज्याच्या वाटचालीवर चर्चा

ByMirror

Oct 3, 2022

केंद्र व राज्य सरकार युवकांचा रोजगार हिसकावून महाराष्ट्राला देशदडीस लावत असल्याचा आरोप

मुठभर भांडवलदारांच्या हितासाठी सत्ताधारी सरकार -रेश्मा आठरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुठभर भांडवलदारांच्या हितासाठी सत्ताधारी सरकार चालत असून, गरिबांचा श्रीमंत देश म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे. भांडवलदार आणखी श्रीमंत होत असून, गरिबांची परिस्थिती आणखी खालवली जाऊन गरीब श्रीमंताची दरी पसरत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या महिला शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे यांनी केले.


एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी या उपक्रमांतर्गत प्रभाग क्र.9 मधील युवक, नागरिक, पक्षाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा संवाद कार्यक्रम दिल्लीगेट येथील अपुर्वा कॉम्युटर इन्स्टिट्यूटच्या सभागृहात पार पडला. यावेळी आठरे बोलत होत्या. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस सारंग पंधाडे, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, ओबीसी सेलचे अमित खामकर, युवक शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, अल्पसंख्यांक विभागाचे साहेबान जहागीरदार, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, उद्योग व व्यापार सेलचे अनंत गारदे, अंकुश मोहिते, वैशाली गुंड, संतोष केदारी, उषा सोनटक्के, मनिषा सरोदे, लता गायकवाड, सुनंदा कांबळे, शितल गाडे, सुनिता पाचरणे, अर्चना केदारी, रेणुका पुंड, अपर्णा पालवे, ओंकार फरतारे, अभिषेक आजबे, जयश्री पाटील आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक व नागरिक उपस्थित होते.


पुढे बोलताना आठरे म्हणाल्या की, 2014 नंतर भाजपचे शुक्लकाष्ट महाराष्ट्राला लागले. दिल्लीचे तख्त खुश करण्यासाठी महाराष्ट्राचे वाटोळे राज्य सरकार करत आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र असलेले मुंबई गुजरातला स्थलांतरित करण्याचे केंद्र सरकारचे षडयंत्र सुरू आहे. अनेक प्रकल्प गुजरातला पळविण्यात येत असून, सर्वसामान्य युवकांचा रोजगार हिसकावून राज्याला देशदडीस लावण्याचे काम केंद्र व राज्यातील सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला.


वैभव ढाकणे म्हणाले की, सर्वसामान्यांना आधार देणार्‍या राष्ट्रवादी पक्षाने महिलांना राजकारणात आरक्षण व विविध क्षेत्रात संधी निर्माण करून दिली. सध्या सत्तेवर असलेला पक्ष मूठभर भांडवलदारांसाठी सत्ता राबवित आहे. तीन टक्के लोकांकडे देशाची सर्वाधिक संपत्ती आहे. देशाचा जीडीपी घसरत असून, अर्थव्यवस्था खालवली जात आहे. युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्‍न गंभीर बनला असून, सत्ताधारी पक्ष धार्मिक भावनेशी खेळून सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांना बगल देत आहे. सर्वात जास्त जीएसटीचा वाटा देणार्‍या महाराष्ट्राला त्याचा परतावा देखील दिला जात नसून, ईडीची भिती दाखवून फोडा आणि राज्य करा!, ही रणनीती भाजप वापरत असल्याचे त्यांनी सांगितले.


सारंग पंधाडे यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून महिला व युवकांचे प्रश्‍न सोडवून समाजकारण केले जात आहे. शहराला देखील आमदार संग्राम जगताप यांनी विकासाचे व्हिजन दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रा. नंदा पांडुळे म्हणाल्या की, खासदार सुप्रियाताई सुळे यांनी युवती व महिलांसाठी मोलाचे योगदान दिले. तळागाळापर्यंत राष्ट्रवादीचे कार्य सुरू आहे. शहरातील राष्ट्रवादीच्या अभ्यासिकेत अनेक गरजू घटकांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली असून, गोरगरिबांना आधार देणार्‍या या पक्षाशी सर्वसामान्यांची नाळ जुडलेली आहे. वैशाली गुंड यांनी राष्ट्रवादीच्या पुढाकाराने महिलांना राजकारणात पन्नास टक्के आरक्षण मिळाले. उंबरठा ओलांडून महिला स्वकर्तृत्वाने आपले स्थान निर्माण करत असल्याचे सांगितले.


प्रा. माणिक विधाते यांनी सुशिक्षित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी पक्षात समावेश असून, समाजकारण व विकासात्मक ध्येयाने शहरात कार्य सुरु आहे. आमदार संग्राम जगताप यांनी शहराला विकासाचे व्हिजन दिले. शहराची ओळख बदलत असून, शहराला शहरीकरणाचे रूप प्राप्त होत असल्याचे स्पष्ट करुन उपस्थितांचे आभार मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *