पाण्याचे नमुने तपासणी करताच समोर आली माहिती
महापालिकेने नागरिकांना किमान पिण्यायोग्य पाणी पुरवावे -सोमनाथ रोकडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रेल्वे स्टेशन भागात नळाद्वारे येणारे पाणीचे नमुने तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य सेवा यांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आले होते. नुकताच त्याचा अहवाल आला असून, सदर पाणी आरोग्याच्या दृष्टीने पिण्यास अयोग्य असल्याचा धक्कादायक अहवाल प्राप्त झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सोमनाथ रोकडे यांनी आपल्या फर्मच्या नावाने महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य सेवा यांच्याकडे 22 सप्टेंबरला नळद्वारे आलेल्या पाणीचे नमुने तपासणीसाठी दिले होते. आलेल्या या अहवालाने महापालिकेच्या जलशुध्दीकरणाचे पितळ उघडे पडले आहे.

या भागात अनेकवेळा दूषित पाण्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. दूषित पाण्यामुळे अनेक नागरिक आजारी पडत असताना, विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले असून, त्यांना उलट्या व जुलाबचा त्रास सुरु झाला आहे. नळाद्वारे येणारे पाणी पिण्यास योग्य आहे की नाही? हे पडताळणीसाठी रोकडे यांनी पाण्याचे नमुने तपासणीला दिल्याने ही धक्कादायक बाब उघड झाली आहे.
महापालिका प्रशासन नागरी सुविधा देण्यास असमर्थ ठरत आहे. सर्वत्र नागरीसुविधांचा बोजवारा उडाला असताना, नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार देखील उघड झाला आहे. महापालिका नागरिकांकडून विविध कर गोळा करत असून, पाणीपट्टी न भरल्यास नळ कनेक्शन कट केले जाते. मात्र कर भरुन देखील नागरिकांना पिण्यायोग्य शुध्द पाणी मिळत नसल्याची शोकांतिका आहे. महापालिकेने नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन किमान पिण्यायोग्य पाणी पुरवावे. -सोमनाथ रोकडे (शहर जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी)
