न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी शोषित घटकांच्या मागे उभे राहणार -गवारे
अहमदनगर (प्रतिनिधी)- इंटरनॅशनल ह्युमन राईटस वेल्फेअर असोसिएशनच्या राष्ट्रीय संचालकपदी नगरचे सामाजिक कार्यकर्ते संजय गवारे यांची नियुक्ती करण्यात आली. असोसिएशनचे अध्यक्ष गणेश वाघचौरे यांनी गवारे यांच्या नियुक्तीची घोषणा करुन त्यांना नियुक्तीपत्र दिले.
इंटरनॅशनल ह्युमन राईटस वेल्फेअर असोसिएशन भारतभर समाजातील वंचित घटकांच्या न्याय, हक्कासाठी कार्यरत आहे. संघटनेने समाजातील अनेक प्रश्नांवर वाचा फोडून दीन-दुबळ्या घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्या युवकांना संधी देण्यात येत असून, गवारे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय कमिटीवर काम करण्याची संधी देण्यात आली असल्याचे गणेश वाघचौरे यांनी सांगितले.
संजय गवारे यांनी महाराष्ट्रासह जिल्ह्यात दीन-दलितांवर अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत आहे. शोषित घटकांच्या मागे उभे राहण्यास कोणी तयार नसल्याने त्यांचा न्याय, हक्क हिरावला जात असून, त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी ह्युमन राईटस वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून कार्य केले जाणार आहे. तर युवकांच्या प्रश्नावर काम करुन त्यांना संघटनेशी जोडण्याचा संकल्प व्यक्त केला.
गवारे संकल्प युवा फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यात सामाजिक कार्य करत असून, त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची राष्ट्रीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
