• Fri. Mar 14th, 2025

सावित्री ज्योती महोत्सवाच्या भिंतीपत्रकाचे अनावरण

ByMirror

Sep 27, 2022

विविध सामाजिक उपक्रमांचा समावेश

सावित्री ज्योती महोत्सवाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे कार्य -डॉ. अमोल बागुल

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात होत असलेल्या सावित्री ज्योती महोत्सवाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे कार्य होणार आहे. बचत गटांच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीतून महिलांच्या हाताला काम व रोजगार मिळणार आहे. जय युवा अकॅडमी व जय स्वयंसेवी संस्था संघटना महाराष्ट्र राज्य महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ. अमोल बागुल यांनी केले.


नेहरू युवा केंद्र संलग्न जय युवा अकॅडमी व जय असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्यच्या वतीने सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात 10 ते 13 ऑक्टोंबर दरम्यान सावित्री ज्योती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या भिंतीपत्रकाच्या अनावरणप्रसंगी डॉ. बागुल बोलत होते. जुन्या कोर्टाजवळील सावित्री ज्योती महोत्सव कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी महोत्सवाचे मुख्य संयोजक अ‍ॅड. महेश शिंदे, अ‍ॅड. सुरेश लगड, अ‍ॅड. सुनील तोडकर, अ‍ॅड. संतोष शिंदे, अ‍ॅड. रघुनाथ बनकर, आरती शिंदे, वैशाली कुलकर्णी, डॉ. संजय गिर्‍हे, नयना बनकर, सिमोन बनकर, अश्‍विनी वाघ, पोपट बनकर, डॉ. भास्कर रणनवरे, दिनेश शिंदे, डॉ. धीरज ससाणे, रजनी ताठे, शेखर होले, स्वाती डोमकावळे, बाळासाहेब पाटोळे आदी उपस्थित होते.


पुढे डॉ. बागुल यांनी बचत गटांच्या उत्पादनांची मागीलप्रमाणे या वर्षीही विक्रमी स्वरूपात विक्री होणार असल्याची आशा त्यांनी व्यक्त केली. या महोत्सवात अहमदनगर महापालिकेच्या वतीने रक्तदान शिबिर, मोफत रक्तगट, हिमोग्लोबिन तपासणी, के.के. बुधराणी हॉस्पिटल तर्फे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शास्त्रक्रिया शिबिर, स्वयंसेवी संस्था मार्गदर्शन कार्यशाळा, लोककला सादरीकरण, अठरा वर्षे पूर्ण केलेल्या युवक-युवतींची मतदार नोंदणी, मुलगी वाचवा अभियान यांसह विविध सामाजिक उपक्रम होणार आहे. या महोत्सवासाठी जालिंदर बोरुडे, विनायक नेवसे, रावसाहेब मगर, भीमराव उल्हारे, शिवाजी नवले, प्रा. सुनील मतकर, मीना म्हसे, आनंद वाघ, जयश्री शिंदे परिश्रम घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *