शहरातडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी बसपा करणार पाठपुरावा
साखर सम्राटांची ओळख पुसून, यापुढे अहमदनगर आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणार -अॅड. संदीप ताजणे
अहमदनगर (प्रतिनिधी)- साखर सम्राटांच्या जिल्ह्याची ओळख पुसून यापुढे अहमदनगर जिल्हा आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणार आहे. बहुजन समाज पार्टी प्रस्थापितांची घराणेशाहीला उपटून फेकण्यासाठी पुढे आली असल्याचे प्रतिपादन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. संदीप ताजणे यांनी केले. तर विखे-थोरातांनी बहुजन समाजाला दावणीला बांधण्याचे काम केल्याचा आरोप त्यांनी केला.
बहुजन समाज पार्टीच्या वतीने टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात शासक बनो, कार्यकर्ता प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना अॅड. ताजणे बोलत होते. यावेळी प्रदेश प्रभारी हुलगेश चलवादी, शहराध्यक्ष संतोष जाधव, भगवान जगताप, जिल्हा प्रभारी संजय डहाणे, सुनील ओहोळ, जिल्हाध्यक्ष जितेंद्र साठे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश अहिरे, महासचिव राजू शिंदे, जिल्हा सचिव सुनील मगर, बामसेफ संयोजक किरण मगर, मीनाताई घोडके, अतुल काते, शहर उपाध्यक्ष उपाध्यक्ष सिद्धार्थ पाटोळे, शहर महासचिव अतुल जाधव, नंदु भिंगारदिवे, दीपक पवार, प्रतीक जाधव, सुरज बोरुडे, कांबळे, उमाशंकर यादव, बाळासाहेब मधे, अमोल सामल आदींसह सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे अॅड. ताजणे म्हणाले की, बहुजन समाज पक्ष जिल्ह्यात सर्व निवडणुका स्वबळावर लढविणार आहे. साखर सम्राटांची घराणेशाही संपविण्यासाठी स्वाभिमानाने कार्यकर्त्यांना बळ दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर अहमदनगर जिल्हा दलित, मागासवर्गीयांवर होणारे अन्याय अत्याचारासाठी आघाडीवर राहिलेला आहे. या शोषणाला जिल्ह्यातील सत्ताधारी व विरोधक दोन्ही जबाबदार असून, स्वार्थाचे राजकारण संपविण्यासाठी बहुजन समाज पक्ष पर्याय म्हणून पुढे आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रदेश प्रभारी हुलगेश चलवादी म्हणाले की, शहराच्या विकासासाठी शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेने बसपा योगदान देत आहे. जिल्ह्यात पक्षाची बांधणी जोमाने सुरू आहे. जिल्ह्यातील घराणेशाही व स्वार्थाच्या राजकारणाने शहर व जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. लोकप्रतिनिधींनी स्वत:चा विकास साधून जिल्ह्याचा विकास होऊ दिला नसल्याने अहमदनगर जिल्हा इतर शहरांच्या तुलनेने मागे राहिला असल्याचा आरोप त्यांनी केला. तर विकास हाच ध्येय व मुद्दा घेऊन बसपा जिल्ह्यात काम करणार असल्याचे स्पष्ट केले.
या मेळाव्यात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करून पक्षाची ध्येय धोरणे, समाजाप्रती असलेली कर्तव्य, काम करण्याची पद्धत, न्यायासाठी संघर्ष, कायदा, मतदान प्रक्रिया आदी बाबत मार्गदर्शन करण्यात आले. शहराध्यक्ष संतोष जाधव यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळ्याचा प्रश्न उपस्थित केला असता, सदर पुतळा उभारण्याबाबत एकमताने ठराव घेऊन यासाठी बसपा पाठपुरावा करणार असल्याचे जाहीर केले. प्रदेश कार्यकारणीच्या वतीने शहराध्यक्ष जाधव यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. शंकर भैलुमे यांची प्रदेश सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. मेहतर समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते राजू गुजर यांनी 40 कार्यकर्त्यांसह बसपा पक्षात प्रवेश केला. तसेच राहुरी व श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील युवकांनी देखील पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान जगताप यांनी केले.