अभियंता व्यवसायात महिलांचा प्रवेश प्रेरणादायी -इंजि. अविनाश कुलकर्णी
अहमदनगर (प्रतिनिधी)- अभियंता म्हणून महिलांना उत्तम संधी असून, या व्यवसायातील त्यांचा प्रवेश प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ स्ट्रक्चरल इंजिनिअर अविनाश कुलकर्णी यांनी केले.
नागापूर येथे स्ट्रक्चरल इंजिनियर वर्षा संदीप कुसळकर यांच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी कुलकर्णी बोलत होते. यावेळी आर्किटेक कविता जैन प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

पुढे कुलकर्णी म्हणाले की, बांधकाम व्यवसायात स्ट्रक्चरल इंजिनियरची भूमिका सर्वाधिक जबाबदारीची असते. पुरुषांचे वर्चस्व असल्या या क्षेत्रात स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून वर्षा कुसळकर यांसारख्या तरुणीही पुढे येत आहेत, हे निश्चितच कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. आर्किटेक कविता जैन यांनी महिला म्हणून बांधकाम व्यवसायात काम करताना कुटुंबाचा पाठिंबा महत्त्वाचा ठरल्याचे सांगितले. तर कौटुंबिक जबाबदारी आणि व्यवसायातील यशाचा कानमंत्र त्यांनी दिला. उच्च शिक्षणा नंतर सरकारी अथवा खाजगी नोकरी या परंपरागत मार्गापलीकडेही तरुणींनी विचार करण्याचे त्यांनी आवाहनही केले. स्ट्रक्चरल इंजिनियर वर्षा कुसळकर यांसारख्या तरुणींना आपला नेहमीच पाठिंबा व प्रोत्साहन राहणार असल्याचे स्पष्ट केले.
वर्षा कुसळकर यांनी कुलकर्णी व जैन यांना श्री गणेशाची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक, नामवंत अभियंते, सामाजिक, कला, आरोग्य व विविध क्षेत्रातील नागरिक व महिलांनी या कार्यालयास भेट देऊन कुसळकर यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
