• Thu. Oct 16th, 2025

घरेलू मोलकरीण कामगारांच्या खात्यावर ते अनुदान जमा

ByMirror

Feb 19, 2022

क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला अखेर यश

अहमदनगर (प्रतिनिधी)- लॉकडाऊन काळात घरेलू मोलकरीण कामगारांसाठी शासनाने मंजूर केलेले दीड हजार रुपयांचे अनुदान शहरातील मोलकरीण महिलांच्या खात्यात नुकतेच वर्ग झाले असून, क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. अनुदान मिळालेल्या महिलांनी संघटनेच्या अध्यक्षा अनिता कोंडा यांचा सत्कार करुन व पेढा भरवून आनंद व्यक्त केला. यावेळी उषा बोराडे, ज्योती बोरुडे, वीणा सोनवणे, प्रमिला रोकडे, रेखा पाटेकर आदी उपस्थित होते.
मागील लॉकडाऊनच्या काळात शासनाने घरेलू मोलकरीण कामगारांसाठी दीड हजार रुपये अनुदान देण्याची मागणी केली होती. त्याबाबत संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा करुन आंदोलन देखील केले. घरेलू मोलकरीण कामगारांसाठी शासनाकडून अनुदान प्राप्त झाले असून, सदर अनुदान अद्यापि लाभार्थींच्या खात्यात वर्ग झाले नव्हते. यासाठी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात पाठपुरावा करण्यात आला. या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, घरेलू मोलकरीण महिलांच्या खात्यावर अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती कोंडा यांनी दिली. तर घरेलू मोलकरीण कामगारांना अनुदान मिळण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल सहाय्यक कामगार आयुक्त व कामगार अधिकारी यांचे संघटनेच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले आहे.
घरेलू मोलकरीण कामगारांची कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिकट बनली होती. टाळेबंदीत त्यांनी उसनवारी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. त्यांना मिळालेल्या अनुदानामुळे मोठा आर्थिक हातभार लागणार आहे. -अनिता कोंडा

One thought on “घरेलू मोलकरीण कामगारांच्या खात्यावर ते अनुदान जमा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *