• Thu. Oct 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

नेवासा ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार? उपचाराअभावी आदिवासी गर्भवतीची रस्त्यातच प्रसूती!

ByMirror

Oct 29, 2026
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन

डॉक्टर गैरहजर, 102 रुग्णवाहिकाही मिळेना; आदिवासी गर्भवतीची रस्त्यातच प्रसूती


आदिवासी गर्भवतीच्या वेदनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप; नेवासा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांवर कारवाईची मागणी


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका आदिवासी गर्भवती महिलेला योग्य वैद्यकीय उपचार व रुग्णवाहिकेची सुविधा वेळेत उपलब्ध करून न दिल्याने तिची रस्त्यातच नैसर्गिक प्रसूती झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि 102 रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन दिले.
रिपाइंचे नेवासा शहराध्यक्ष तथा तक्रारदार विशाल इंगळे, रिपाइं (गवर्इ) महिला शहर जिल्हाध्यक्षा ज्योती पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. रिपाइंचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्याकडून 15 ऑक्टोबर 2026 रोजी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आपण नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयाकडे गेलो असता, संबंधित आदिवासी गर्भवती महिलेची रस्त्यातच प्रसूती झाल्याचे समजल्याचे विशाल इंगळे यांनी निवेदनात म्हटले आहे.


निवेदनानुसार, प्रीती शरद पवार (वय 19) या महिलेचे कायमस्वरूपी वास्तव्य बारगाव नांदूर, ता. राहुरी येथे असून, सध्या त्या नेवासा तालुक्यातील देडगाव येथे ऊसतोडणीच्या कामासाठी आल्या आहेत. श्री ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखाना लि., भेंडा येथे सुरू असलेल्या 2026-27 च्या ऊसगाळप हंगामासाठी त्या आपल्या कुटुंबीयांसह आल्या असल्याचे नमूद करण्यात आले आहे.


15 ऑक्टोबर रोजी रात्री साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास प्रीती पवार यांना प्रसूतीच्या कळा सुरू झाल्याने त्यांचे नातेवाईक त्यांना नेवासा ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले. त्यावेळी रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नसून नर्सिंग स्टाफ उपस्थित होता, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
नर्सिंग स्टाफने संबंधित डॉक्टरांना मोबाईलद्वारे रुग्णालयात गर्भवती महिला आल्याची माहिती दिली. महिलेच्या सोनोग्राफी अहवालाची फाईल पाहिल्यानंतर बाळाची स्थिती पायाळू असल्याचे सांगत येथे प्रसूती होऊ शकणार नसल्याचे आणि पुढील उपचारांसाठी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात जाण्याचे सांगण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. मात्र, डॉक्टर रुग्णालयात उपस्थित झाले नाहीत, गर्भवती महिलेला अहिल्यानगर येथे पाठविण्याचा सल्ला देण्यात आला; मात्र रुग्णालयात 102 रुग्णवाहिका उपलब्ध असतानाही ती वेळेत उपलब्ध करून देण्यात आली नाही, असा आरोप रिपाइंच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित महिला व तिच्या नातेवाईकांना खासगी वाहनाने अहिल्यानगरच्या दिशेने निघावे लागले.


रुग्णालयातून निघाल्यानंतर अवघ्या आठ ते दहा मिनिटांत प्रवासादरम्यानच महिलेची नैसर्गिक प्रसूती झाल्याचे निवेदनात नमूद आहे. त्यानंतर नातेवाईकांनी पुढील उपचारांसाठी तिला नेवासा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती महिलेला वेळेत वैद्यकीय मदत, आवश्‍यक उपचार आणि रुग्णवाहिकेची सुविधा मिळणे अपेक्षित असताना या प्रकरणात निष्काळजीपणा झाल्याचा आरोप रिपाइंच्या वतीने करण्यात आला आहे. संबंधित महिलेची प्रसूती रस्त्यात होण्याची वेळ येणे ही गंभीर बाब असल्याचे पक्षाने निवेदनात म्हटले आहे.


या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन नेवासा ग्रामीण रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासावे, घटनेच्या वेळी ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांची व नर्सिंग स्टाफची सखोल चौकशी करावी, तसेच 102 रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांची भूमिका तपासून दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सकांकडे करण्यात आली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *