आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभारंभ; जिल्हा व जिल्हा बाहेरील ग्रामीण भागातील नागरिकांची होणार सोय
उत्पादक कंपन्यांचे फटाके आता थेट ग्राहकांना होलसेल दरात!
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची होणारी गर्दी आणि ग्राहकांची वाढती गरज लक्षात घेऊन नगर-मनमाड रोडवरील सावेडी नाका येथे नगर फटाका असोसिएशनच्या वतीने संचलित होलसेल फटाका मार्केट सुरू करण्यात आले आहे. या मार्केटचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. या सुविधेमुळे जिल्हा व जिल्हाबाहेरील ग्रामीण भागातून शहरात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना दिवाळीसाठी विविध प्रकारचे फटाके होलसेल दरात खरेदी करण्याची सोय उपलब्ध झाली आहे.
या शुभारंभप्रसंगी नगरसेवक सुरेश बनसोडे, विकी जगताप, नगर फटाका असोसिएशनचे दीपक खेडकर, बाळासाहेब महामुनी, निलेश विळदकर, सनी घोरपडे, ऋत्विक शेठ, दरंदले बंधू, संकल्प राऊत, योगेश रोकडे, गोपाल बोरुडे, मंगेश सांगळे, कोतकर मेजर, हरिदास सांगळे, जालिंदर सातपुते, अशोक तांदळे, योगेश मुदळ, अक्षय भगत, दत्ताशेठ वाबळे, अमोल जाधव, सतीश बारस्कर, दत्तात्रय वाबळे, योगेश भुजबळ, योगेश रोकडे, अशोक तांदळे, गोपाळ बोरुडे, सनी घोरपडे, निलेश खळदकर आदी उपस्थित होते.
अहिल्यानगरच्या ग्रामीण भागासह जिल्ह्याला लागून असलेल्या इतर जिल्ह्यातील नागरिकांना सोय होण्याच्या उद्देशाने नगर फटाका असोसिएशनच्या माध्यमातून सावेडी नाका येथे प्रशस्त जागेत होलसेल फटाका मार्केट सुरू करण्यात आले आहे. दिवाळीच्या काळात फटाक्यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांना सोयीचे ठिकाण उपलब्ध व्हावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
शुभारंभप्रसंगी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की, अहिल्यानगर शहर हे होलसेल फटाका मार्केटचे केंद्र बनत आहे. अनेक मोठ्या शहरातून नागरिक खास फटाके खरेदी करण्यासाठी शहरात येतात. ग्रामीण भागातून व इतर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या खरेदीसाठी सोयीचे ठिकाण उपलब्ध व्हावे, यासाठी नगर फटाका असोसिएशनच्या माध्यमातून सावेडी नाका येथे होलसेल फटाका मार्केटची सुविधा करण्यात आली आहे. प्रशस्त जागेत सुरू करण्यात आलेल्या या मार्केटमध्ये फटाका उत्पादक कंपन्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत होलसेल दरात उपलब्ध होत आहे. त्यामुळे नागरिकांना दिवाळीच्या खरेदीसाठी या मार्केटचा लाभ घेता येईल, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
नगर फटाका असोसिएशनचे दीपक खेडकर यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील नागरिकांची गरज ओळखून सावेडी नाका येथे मागील अनेक वर्षांपासून असोसिएशनच्या माध्यमातून होलसेल फटाका मार्केट सुरू आहे. दिवाळीच्या काळात नागरिकांना विविध प्रकारचे आणि दर्जेदार फटाके होलसेल दरात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. अहिल्यानगरसह इतर जिल्ह्यातील नागरिकांचा देखील खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळतो. या मार्केटमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना फटाक्यांच्या खरेदीसाठी सोयीची सुविधा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

