महिला सक्षमीकरणाच्या कार्याची दखल; महिलांना दाखवली स्वावलंबनाची वाट
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महिला सक्षमीकरण, स्वयंरोजगार आणि सामाजिक बांधिलकीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साई श्रद्धा फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा अर्चना चंद्रकांत परकाळे यांना स्नेहबंध सोशल फाऊंडेशनच्या वतीने ‘आदर्श समाजसेविका’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे, दुर्बल घटकांतील महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे आणि गरजू महिला व युवतींना स्वावलंबनाची दिशा दाखविणे या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
स्नेहबंध सोशल फाऊंडेशनच्या वतीने नुकतेच जिल्हास्तरीय उत्कृष्ट गौरी आरास स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्या हस्ते अर्चना परकाळे यांना आदर्श समाजसेविका पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अर्चना परकाळे या साई श्रद्धा फाऊंडेशनच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत आहेत. समाजातील दुर्बल आणि गरजू घटकांतील महिलांना सक्षम करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे, यासाठी त्या विविध उपक्रम राबवितात. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना शासकीय योजनांची माहिती देणे, त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक सहकार्य करणे आणि विविध शासकीय प्रक्रियांमध्ये मार्गदर्शन करण्याचे कार्य सुरु आहे.
अनेकदा आवश्यक कागदपत्रे, दाखले आणि शासकीय योजनांची माहिती नसल्यामुळे गरजू महिला व युवती विविध लाभांपासून वंचित राहतात. ही अडचण लक्षात घेऊन परकाळे या महिलांना आवश्यक दाखले मिळवून देण्यासाठी मदत करतात. शासकीय योजनांचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन करून महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महिलांचे सक्षमीकरण केवळ आर्थिक मदतीपुरते मर्यादित न ठेवता त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आवश्यक कौशल्ये मिळावीत, या उद्देशाने अर्चना परकाळे विविध उपक्रम राबवितात. महिला आणि युवतींसाठी व्यावसायिक मार्गदर्शन, कौशल्यविकास शिबिरे आणि स्वयंरोजगाराच्या संधींबाबत माहिती देण्याचे काम त्यांच्या माध्यमातून केले जाते.
महिलांमध्ये असलेल्या कौशल्यांना योग्य दिशा मिळाल्यास त्या स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात आणि कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नात भर घालू शकतात. याच विचारातून महिलांना व्यवसायाच्या विविध संधींची माहिती देणे, त्यांना आवश्यक मार्गदर्शन करणे आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करणे, यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास त्यांचे कुटुंब आणि पर्यायाने संपूर्ण समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकतो. त्यामुळे महिलांना केवळ मदतीचा लाभार्थी न ठेवता त्यांना स्वावलंबी बनविणे, हा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा उद्देश आहे. अर्चना परकाळे यांच्या महिला सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या कार्याची दखल घेऊन स्नेहबंध सोशल फाऊंडेशनच्या वतीने त्यांना आदर्श समाजसेविका पुरस्कार प्रदान करण्यात आला असल्याचे स्नेहबंध सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी सांगितले. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

