उपक्रमशील शिक्षक बाबासाहेब बोडखे यांचा सामाजिक उपक्रम
वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आधार दिल्यास समाजाची प्रगती शक्य -सुहास धीवर
अहमदनगर (प्रतिनिधी)- आजची बालके उद्याच्या सशक्त भारताचे भवितव्य आहे. लहान वयातच मुलांची जडण घडण होत असते. गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्याचे प्रेरणादायी कार्य उपक्रमशील शिक्षक बाबासाहेब बोडखे सातत्याने करत आहे. वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आधार दिल्यास त्यांचे उज्वल भवितव्य घडून समाजाची प्रगती होणार असल्याचे प्रतिपादन पंडित नेहरु हिन्दी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुहास धीवर यांनी केले.
राष्ट्रभाषा शिक्षा मंडळ संचलित भुईकोट किल्ला येथील पंडित नेहरु हिन्दी विद्यालय व प्राथमिक शाळेत शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. राष्ट्रभाषा शिक्षा मंडळाचे अध्यक्ष तथा मर्चंट बँकेचे संस्थापक हस्तीमलजी मुनोत यांच्या वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक धीवर बोलत होते. यावेळी शालेय शिक्षक गोपीचंद परदेशी, कमल भोसले, कविता जोशी, विनीत थोरात, वैभव शिंदे, सुदेश छजलाने, शिल्पा पाटोळे, मोनिका मेहतानी, प्राथमिकच्या मुख्याधापिका उज्वला आदिक, अंजली मिश्रा, ठाकुरदास परदेशी, योगेश गायकवाड आदी उपस्थित होते.
बाबासाहेब बोडखे म्हणाले की, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना सहानुभूतीपेक्षा मदतीचा हात देण्याची गरज आहे. समाजाच्या प्रवाहात दुर्बल घटकातील मुलांना आनण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहे. ज्ञानाने दारिद्रय दूर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संस्थेचे अध्यक्ष हस्तीमलजी मुनोत यांचे सामाजिक योगदान दिशादर्शक असून, त्यांनी सहकार क्षेत्राबरोबर शिक्षण क्षेत्रात सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी या संस्थेची स्थापना केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संस्थेचे सचिव किशोर मुनोत यांनी कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात व्यत्यय आला. विद्यार्थ्यांची गरज ओळखून बाबासाहेब बोडखे यांनी घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी तसेच विद्यार्थी व शिक्षकांचे अडीअडचणी समजावून घेऊन संस्था पातळीवर सर्व प्रकारचे सहकार्य केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपस्थित शिक्षकांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाच्या स्वाध्याय पुस्तिका, वह्या, पेन, मास्क, हॅन्डवॉश, वर्कबुक, प्रश्नसंच आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. नवीन शैक्षणिक साहित्याची भेट मिळाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर दिसत होता.