• Fri. Sep 11th, 2026

Mirrornews24

Marathi News

बाबासाहेब बोडखेंच्या नेतृत्वाखाली माध्यमिक शिक्षक सोसायटी प्रगतीपथावर -आमदार संग्राम जगताप

ByMirror

Sep 10, 2026
अवघ्या काही दिवसांत 22 कोटी 42 लाखांच्या ठेवी; सोसायटीला स्वभांडवली करण्याचा संकल्पाचे कौतुक

माध्यमिक शिक्षक सोसायटीचे नुतन चेअरमन बाबासाहेब बोडखे यांचा आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने सत्कार


अवघ्या काही दिवसांत 22 कोटी 42 लाखांच्या ठेवी; सोसायटीला स्वभांडवली करण्याचा संकल्पाचे कौतुक


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदी बिनविरोध नियुक्ती झाल्याबद्दल शिक्षक नेते बाबासाहेब बोडखे यांचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बाबासाहेब बोडखे हे चळवळीतून घडलेले नेतृत्व असून, सामाजिक कार्यातही त्यांचा सातत्याने पुढाकार राहिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली माध्यमिक शिक्षक सोसायटी निश्‍चितच प्रगतीपथावर जाईल, असा विश्‍वास आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला. यावेळी प्रा. माणिक विधाते, सोसायटीचे माजी चेअरमन आप्पासाहेब शिंदे, प्रा. सुधाकर सुंबे, संचालक महेंद्र हिंगे, राजेंद्र कोतकर, प्रा. शिवाजी घाडगे, प्रा. दत्तात्रय दरेकर, प्रा. निलेश बांगर, सचिव स्वप्निल इथापे, दीपक आमटे आदी उपस्थित होते.


पुढे आमदार जगताप म्हणाले की, अवघ्या काही दिवसांच्या कालावधीत संस्थेत तब्बल 22 कोटी 42 लाख रुपयांच्या ठेवी जमा करून संस्था स्वभांडवली करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. हा उपक्रम अत्यंत महत्त्वाकांक्षी असून, त्याला सभासदांकडून मिळत असलेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे. संस्थेवरील अनावश्‍यक खर्च कमी करून उपलब्ध आर्थिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करण्याच्या दिशेने सुरू असलेले कामही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.


बाबासाहेब बोडखे म्हणाले की, माध्यमिक शिक्षक सोसायटीमध्ये परिवर्तन मंडळाची सत्ता आल्यानंतर सभासद हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन संस्थेचा कारभार सुरू करण्यात आला आहे. संस्थेचा कारभार अधिक काटकसरीने करण्याबरोबरच अनावश्‍यक आणि वाढीव खर्चाला फाटा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संस्थेच्या आर्थिक स्थितीला अधिक बळकटी देण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. संस्था स्वभांडवली करण्याच्या उद्देशाने सभासदांच्या सहकार्याने वाटचाल सुरू आहे. संस्थेच्या माध्यमातून सभासदांना अधिक चांगल्या आर्थिक सुविधा उपलब्ध करून देतानाच कर्जावरील व्याजदर कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी ऐच्छिक ठेव वाढ अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाला सभासदांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अवघ्या काही दिवसांतच 22 कोटी 42 लाख रुपयांच्या ठेवी संस्थेत जमा झाल्या आहेत, अशी माहिती बोडखे यांनी दिली. सभासदांनी दाखविलेला विश्‍वास आणि सहकार्य हे संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रा. माणिक विधाते यांनी बाबासाहेब बोडखे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. शिक्षक सोसायटीच्या माध्यमातून सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊन संस्था अधिक सक्षम करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना सर्वांचे सहकार्य मिळेल, असा विश्‍वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *