• Wed. Sep 9th, 2026

Mirrornews24

Marathi News

केंद्रस्तर विशेष शिक्षकांच्या मागण्यांवर आमदार दराडेंचे सकारात्मक आश्वासन; ‘सीईओं’शी चर्चा करून प्रश्न सोडविणार

ByMirror

Sep 9, 2026
दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबता कामा नये’; विशेष शिक्षकांच्या अवांतर कामांवर आमदार दराडेंचा आक्षेप

‘दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबता कामा नये’; विशेष शिक्षकांच्या अवांतर कामांवर आमदार दराडेंचा आक्षेप


नऊ महिन्यांपासून BLOच्या कामात गुंतविले; विशेष शिक्षकांचा आमदार दराडेंकडे प्रलंबित प्रश्नांसाठी धाव


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा परिषद व महानगरपालिका शिक्षण विभागातील केंद्रस्तर विशेष शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्या व मागण्यांबाबत शिवसेना केंद्रस्तर विशेष शिक्षक सेलच्या वतीने नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाची दखल घेत आमदार दराडे यांनी लवकरच मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्याशी चर्चा करून विशेष शिक्षकांच्या समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
केंद्रस्तर विशेष शिक्षकांकडून दिव्यांग विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन, वैयक्तिक शैक्षणिक नियोजन, पालकांचे समुपदेशन तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्याचे महत्त्वपूर्ण काम केले जाते. मात्र, या शिक्षकांना त्यांच्या मूळ कर्तव्यांशी संबंधित नसलेली विविध अवांतर कामे सोपविली जात असल्याने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मुद्दा निवेदनातून मांडण्यात आला.


आमदार किशोर दराडे यांनी यावेळी विशेष शिक्षकांच्या भूमिकेचे समर्थन करताना, “केंद्रात दिव्यांग विद्यार्थी असताना विशेष शिक्षकांना अनावश्यक कामकाजात गुंतवून ठेवणे चुकीचे आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा मूलभूत अधिकार अबाधित राहिला पाहिजे,” अशी भूमिका मांडली. विशेष शिक्षकांसाठी योग्य नियोजन करून त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. अनेक वर्षांपासून सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा योग्य गौरव व सन्मान झाला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.


केंद्रस्तर विशेष शिक्षक सेलचे अध्यक्ष उमेश बलभीम शिंदे यांनी विशेष शिक्षकांच्या समस्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची मागणी केली. ते म्हणाले, “हा लढा केवळ शिक्षकांच्या सेवा-सुविधांचा नसून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेला आहे. विशेष शिक्षकांना बीएलओसारख्या कामांमध्ये दीर्घकाळ गुंतवून ठेवल्यामुळे ते त्यांच्या मूळ शैक्षणिक कार्यापासून दूर जात आहेत. परिणामी दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक मार्गदर्शन व सुविधा मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत.”
काही केंद्रांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाईची भीती दाखवून शिक्षकांवर दबाव आणला जात असल्याची तक्रारही त्यांनी केली. विशेष शिक्षकांना सुरक्षित, सन्मानजनक आणि त्यांच्या मूळ कार्याला पूरक वातावरण उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.


विशेष शिक्षकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये बीएलओ व अवांतर कामांतून मुक्तता, सामान्य शाळेतील वर्गकामाची सक्ती थांबवावी, अतिरिक्त कामांचा भार कमी करावा, स्वतंत्र कार्यस्थळ व सुविधा द्याव्यात, शासकीय ओळखपत्र द्यावे, मस्टरबाबत स्पष्ट निर्देश द्यावेत, कार्याचा गौरव करावा या प्रश्नाचा समावेश आहे.
विशेष शिक्षकांच्या या प्रश्नांवर प्रशासनाशी चर्चा करून योग्य तो तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार किशोर दराडे यांनी दिले.
यावेळी शिक्षक नेते वैभव सांगळे, सुनील पंडित, आप्पासाहेब शिंदे, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे आदी उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *