मोबाईलच्या माध्यमातून लोकहिताचा आवाज बुलंद करणाऱ्यांना गौरव; पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसदेचा उपक्रम
फॉलोअर्स नव्हे, सत्यनिष्ठेला प्राधान्य; ‘सोशल मीडिया लोकमान्य स्वराज्य सैनिक गौरव योजने’तून डिजिटल कार्यकर्त्यांचा सन्मान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजमाध्यमांचा वापर करून अन्याय, भ्रष्टाचार, सामाजिक विषमता आणि लोकहिताच्या प्रश्नांवर जनजागृती करणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसद यांच्या वतीने ‘सोशल मीडिया लोकमान्य स्वराज्य सैनिक गौरव योजना’ जाहीर करण्यात आली आहे. ‘तिरंगा राष्ट्रीय धारणालय क्रांती’ या उपक्रमाचा हा एक भाग असल्याचे संघटनांकडून सांगण्यात आले.
समाजमाध्यमांच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून विविध सामाजिक प्रश्न मांडले जात आहेत. अन्याय किंवा गैरप्रकारांविषयी माहिती उपलब्ध करून देणे, लोकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविणे तसेच विविध विषयांवर जनजागृती करणे यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करणाऱ्या व्यक्तींना या उपक्रमातून प्रोत्साहन देण्याचा उद्देश असल्याचे संघटनांनी स्पष्ट केले.
पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. कारभारी गवळी यांनी सांगितले की, समाजमाध्यमांवरील लोकप्रियता किंवा फॉलोअर्सची संख्या हा सन्मानाचा निकष असणार नाही. संबंधित व्यक्तीने सत्याधारित माहिती मांडणे, उपलब्ध पुराव्यांचा जबाबदारीने वापर करणे आणि लोकहिताच्या प्रश्नांवर अहिंसक पद्धतीने जनजागृती करणे याला महत्त्व दिले जाणार आहे.
योजनेअंतर्गत समाजमाध्यमांवर सक्रिय असलेल्या नागरिकांच्या कार्याचा विचार केला जाणार आहे. पत्रकार, विद्यार्थी, महिला, शेतकरी, कामगार, विधिज्ञ तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींनाही या उपक्रमासाठी विचारात घेतले जाणार असल्याचे संघटनांनी म्हटले आहे.
माहितीची सत्यता पडताळणे, पुराव्यांच्या आधारे विषय मांडणे, संबंधित व्यक्तींच्या मानवी प्रतिष्ठेचा आदर राखणे आणि चुकीची माहिती समोर आल्यास तिची दुरुस्ती करणे, या बाबींना महत्त्व दिले जाणार आहे. समाजमाध्यमांचा वापर जबाबदारीने करून लोकहिताचे प्रश्न मांडणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
त्याचबरोबर द्वेषमूलक प्रचार, हिंसेचे समर्थन, अफवा, खोटी किंवा बनावट माहिती, बदनामी तसेच व्यक्तीच्या गोपनीयतेचे उल्लंघन करणाऱ्या स्वरूपाचे काम करणाऱ्यांना या सन्मानासाठी पात्र ठरविले जाणार नाही,
संविधानिक मूल्ये आणि लोकहिताच्या प्रश्नांसाठी डिजिटल माध्यमातून काम करणाऱ्या नागरिकांना दिला जाणारा प्रतीकात्मक नागरी सन्मान असल्याचेही संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
निवड प्रक्रियेत कार्याची सत्यता, त्यामागील पुरावे आणि समाजावर झालेला परिणाम यांचा विचार केला जाणार आहे. समाजमाध्यमांवरील प्रसिद्धीपेक्षा जबाबदार माहिती प्रसारित करणे आणि लोकहिताच्या प्रश्नांना योग्य पद्धतीने वाचा फोडणे याला अधिक महत्त्व देण्यात येणार आहे.
अॅड. कारभारी गवळी म्हणाले की, “फॉलोअर्सची संख्या कोणालाही सोशल मीडिया स्वराज्यसैनिक बनवत नाही. सत्यनिष्ठा, घटनात्मक मूल्यांवरील विश्वास, अहिंसक पद्धतीने प्रश्न मांडणे आणि लोकहितासाठी केलेले कार्य हीच या सन्मानाची प्रमुख पात्रता आहे.”
समाजमाध्यमांचा सकारात्मक आणि जबाबदार वापर वाढावा, नागरिकांनी सत्याधारित माहितीच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न मांडावेत आणि लोकहिताच्या विषयांवर व्यापक जनजागृती व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेने म्हटले आहे. या मोहिमेसाठी अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, राहुल आढाव, बाळासाहेब पालवे, आनंद आढाव, अशोक भोसले, पोपट भोसले, वीर बहादुर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, अभिमान शिंदे, बाबासाहेब भोसले, अमित थोरात आदी प्रयत्नशील आहेत.

