‘नोटीस न देता दुकान, गोठा, शेड पाडले; 30 ते 35 लाखांचे नुकसान’ झाल्याचा आरोप; दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
शिवसेना सामाजिक न्याय विभागाचा आंदोलनाचा इशारा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील क्लेरा ब्रुस बॉईज हायस्कूल मैदानावरील जागेचा वादात सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. संबंधित जागेवर अनेक वर्षांपासून उदरनिर्वाहाचे साधन उभे करणारे स्टीफन दिलीप पंचमुख यांनी कोणतीही कायदेशीर नोटीस किंवा पूर्वसूचना न देता त्यांचे दुकान, गोठा, पत्र्याचे शेड, लोखंडी पिंजरे यांसह सर्व बांधकामे जमीनदोस्त करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांच्या ताब्यातील जनावरे आणि विविध जातींच्या कुत्र्यांना परस्पर ताब्यात घेऊन काही जनावरे बेपत्ता झाल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
या प्रकरणाबाबत सहाय्यक वनसंरक्षक एस. ए. केसरकर यांनी यापूर्वी चौकशी सुरू असून 15 दिवसांत अहवाल सादर केला जाईल, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या संपूर्ण प्रकरणात झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई मिळावी, संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा 15 ऑगस्ट पासून नाशिक विभागीय आयुक्त कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांना देण्यात आले. यावेळी शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाप्रमुख विनोद साळवे, छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे, तक्रारदार स्टीफन पंचमुख, शिवसेना सामाजिक न्याय विभागचे जिल्हा सचिव विजय लोंढे, नंदीवाले तिरुमल समाजाचे नेते सुभाष काकडे, धडक कामगार संघटनेचे जिल्हाप्रमुख श्रीधर शेलार, मुक्ता शेडाळे, दिपक कांबळे, आकाश पंचमुख, गोपाळ मालपाणी, केवल भिंगारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
स्टीफन पंचमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्लेरा ब्रुस बॉईज हायस्कूल परिसरातील संबंधित जागा वाईडर चर्च मिनिस्ट्रीज या संस्थेने 22 नोव्हेंबर 2014 रोजी त्यांना 99 वर्षांच्या करारावर उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करण्यासाठी वापरण्यास दिली होती. त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी पत्र्याचे शेड, जनावरांसाठी गोठा, विविध जातींच्या कुत्र्यांसाठी लोखंडी पिंजरे तसेच छोटे दुकान उभारले. या व्यवसायातूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता.
पंचमुख यांच्या म्हणण्यानुसार, क्लेरा ब्रुस मैदानाच्या मालकी हक्काचा वाद न्यायालयात प्रलंबित असून न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित जागा तहसीलदारांच्या ताब्यात ठेवण्यात आली होती. तरीही त्या जागेवरील त्यांचा प्रत्यक्ष ताबा कायम होता. दरम्यान, 1 एप्रिल 2026 रोजी पत्नी गर्भवती असल्यामुळे ते बीड जिल्ह्यातील गेवराई येथे गेले होते. त्याचवेळी सामाजिक वनीकरण विभागाच्या वनक्षेत्रपाल मनिषा सरोदे यांनी फोन करून तातडीने शेड, दुकान, गोठा व पिंजरे हटविण्याची सूचना दिली. जागेचा वाद न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगूनही अधिकाऱ्यांनी ते ऐकून न घेता जागा रिकामी करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप पंचमुख यांनी केला आहे.
4 एप्रिल 2026 रोजी ते गेवराई येथे असतानाच सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणतीही कायदेशीर नोटीस अथवा संमती न घेता त्यांच्या दुकानावर, पत्र्याच्या शेडवर, गोठ्यावर आणि लोखंडी पिंजऱ्यांवर कारवाई करून ते पाडून टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचवेळी 20 गायी, 14 वासरे, 13 बकऱ्या आणि विविध जातींच्या कुत्र्यांना परस्पर ताब्यात घेण्यात आले. काही जनावरे अद्यापही बेपत्ता असून त्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नसल्याचा दावा पंचमुख यांनी केला आहे. या कारवाईमुळे सुमारे 30 ते 35 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
न्यायालयीन आदेश अस्तित्वात असतानाही सामाजिक वनीकरण विभागाने संबंधित जागेवर नांगरणी करून जमिनीचे सपाटीकरण केले. तसेच तारेचे कुंपण आणि लोखंडी गेट उभारून जागेचा ताबा घेतल्याचा आरोपही पंचमुख यांनी केला आहे. या संदर्भात विभागीय वन अधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनक्षेत्रपाल तसेच सामाजिक वनीकरण विभाग, नाशिक येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटिसा पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र कोणतीही ठोस कारवाई न करता केवळ उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी स्टीफन पंचमुख यांनी कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यानंतर सामाजिक वनीकरण विभागाला नियमानुसार चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र अद्याप कोणतीही लेखी माहिती अथवा निर्णय मिळालेला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दुकान, गोठा, जनावरे आणि व्यवसायाचे संपूर्ण साधन नष्ट झाल्यामुळे आपल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याचे पंचमुख यांनी सांगितले. वृद्ध वडील, पत्नी, बहीण आणि कुटुंबातील अन्य सदस्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह आपल्यावर अवलंबून असून प्रशासनाने तातडीने न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

