पेन्शनरांच्या हक्कांसाठी संघटना अधिक सक्षमपणे काम करणार; विविध प्रश्नांवर बैठकीत सखोल चर्चा
ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानासाठी संघटित प्रयत्नांची गरज; नव्या पदाधिकाऱ्यांचा निर्धार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा पेन्शनर असोसिएशनची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी जुनी कार्यकारिणी बरखास्त करून नव्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली. बैठकीत पेन्शनधारकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी एन. एम. पवळे, उपाध्यक्षपदी वसंत थोरात व मिलिंद वैद्य, कार्याध्यक्षपदी डी. यू. देशमुख, खजिनदारपदी डी. एम. टेपाळे, सहखजिनदारपदी आर. जी. शेख, चिटणीसपदी आर. के. गावडे तर सरचिटणीसपदी मधुकर खताळ यांची एकमताने निवड करण्यात आली.
याशिवाय सल्लागार म्हणून रमेश शहा, एस. एस. परशुरामी, रवींद्र गणगले, दिलीप पाठक, लक्ष्मण जगताप आणि अन्वर शेख यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून नंदू ढापसे, मुठाळ, सतीश वाघ, पेरणे, अनिल पठाण, वाखारे, नवनाथ भालेराव, वसंत गायकवाड, बाबा डवरे, श्रीमती वाघ, शांताबाई शेकटकर, पेटारेबाई आणि द्वारका किंगर यांची निवड करण्यात आली.
बैठकीत निवृत्त कर्मचारी व पेन्शनधारकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, महागाई भत्ता, आरोग्य सुविधा, कौटुंबिक पेन्शन, कार्यालयीन कामकाजातील विलंब, शासन निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा करून पेन्शनरांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटना अधिक सक्रियपणे कार्य करेल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
नवनियुक्त अध्यक्ष एन. एम. पवळे म्हणाले की, अहिल्यानगर जिल्हा पेन्शनर असोसिएशन ही केवळ एक संघटना नसून हजारो निवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांचा विश्वास आहे. सेवेत असताना प्रत्येक कर्मचाऱ्याने शासनासाठी प्रामाणिकपणे योगदान दिले आहे. निवृत्तीनंतर त्यांना सन्मानाने आणि स्वाभिमानाने जीवन जगता यावे, यासाठी त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे ही संघटनेची प्रमुख जबाबदारी आहे.
पेन्शनधारकांच्या विविध समस्या शासन आणि प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू. महागाई भत्ता, आरोग्य सुविधा, कौटुंबिक पेन्शन, डिजिटल सेवांमधील अडचणी तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाशी संबंधित सर्व प्रश्नांसाठी संघटना आवाज उठवेल. संघटनेतील प्रत्येक सदस्याला समान न्याय मिळावा, त्यांचे प्रश्न वेळेत सोडविले जावेत आणि जिल्ह्यातील प्रत्येक पेन्शनधारकापर्यंत संघटनेचे कार्य पोहोचावे, यासाठी नवीन कार्यकारिणी समर्पित भावनेने काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

