• Sun. Jun 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

‘ज्ञानाचा दिवा प्रत्येक घरात’; ज्ञानरचना सोशल फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप

ByMirror

Jun 27, 2026
‘ज्ञानाचा दिवा प्रत्येक घरात’; ज्ञानरचना सोशल फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप

लोणी मावळा येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण

आर्थिक अडचणी शिक्षणाच्या आड येऊ देणार नाही -सुप्रिया मावळे चौधरी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण खंडित होऊ नये, या सामाजिक बांधिलकीतून कार्यरत असलेल्या ज्ञानरचना सोशल फाउंडेशनच्या वतीने पारनेर तालुक्यातील लोणी मावळा येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी आवश्‍यक शैक्षणिक किटचे वितरण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत तीस विद्यार्थ्यांना वह्या, दप्तर, कंपास बॉक्स तसेच इतर आवश्‍यक शैक्षणिक साहित्य देण्यात आले.


कार्यक्रमात ज्ञानरचना सोशल फाउंडेशनच्या संचालिका सौ.सुप्रिया मावळे चौधरी व सारिका मावळे यांच्या मातोश्री सुनंदा गौतम मावळे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेच्या संचालिका सौ सुप्रिया मावळे चौधरी संचालक प्रविण साळवे, भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नानाभाऊ मावळे, सचिव नवनाथ शेंडकर, ज्येष्ठ पत्रकार सुरेश खोसे पाटील , मुख्याध्यापक मच्छिंद्र राऊत, विकास शेंडकर, बाबासाहेब दौंड, संतोष झरेकर, बाबाजी मावळे, बाळासाहेब मापारी, हरिभाऊ जाधव, रघुनाथ पवार, सौ. गुंड, अमृता लोंढे, आदिनाथ वाघ, विजय लाळगे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रास्ताविकात संस्थेचे संचालक प्रविण साळवे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, ज्ञानरचना सोशल फाउंडेशनची स्थापना 2023 मध्ये करण्यात आली असून सौ. सुप्रिया मावळे चौधरी, सारिका मावळे आणि प्रविण साळवे यांच्या पुढाकारातून भारत सरकारकडे सेक्शन-8 कंपनी म्हणून संस्थेची नोंदणी करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक उन्नती हे ध्येय समोर ठेवून संस्था विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवत आहे.
संस्थेच्या माध्यमातून एज्युकेशनल मटेरियल बँक, सामाजिक संस्थांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यशाळा, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी सर्पदंश व त्यावरील उपाययोजना विषयक जनजागृती कार्यक्रम, ग्रामीण महिलांसाठी शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्र, तसेच सामाजिक, व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा राज्य व राष्ट्रीय स्तरावर गौरव सोहळा अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.


यावेळी बोलताना सुप्रिया चौधरी यांनी सांगितले की, शिक्षण हीच खरी समाज परिवर्तनाची ताकद आहे, यावर आमचा दृढ विश्‍वास आहे. प्रत्येक मुलामध्ये अमर्याद क्षमता असते; मात्र अनेक वेळा आर्थिक अडचणीमुळे त्या क्षमतेला योग्य दिशा मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून ज्ञानरचना सोशल फाउंडेशन हा उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे संचालिका सुप्रिया मावळे चौधरी म्हणाल्या की, ज्ञानरचना सोशल फाउंडेशन महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमध्ये शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि व्यावसायिक कौशल्य विकास या क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. संस्थेच्या वतीने सुरू असलेली एज्युकेशन मटेरियल बँक गेल्या चार वर्षांपासून शैक्षणिक साहित्य वितरणाचा उपक्रम राबवत आहे. या उपक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे ज्ञानाचा प्रवाह प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविणे आणि संसाधनांच्या अभावामुळे एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू न देणे हा आहे.


संस्थेने उभारलेल्या शैक्षणिक साहित्य बँकेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल, दुर्गम आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आवश्‍यक शैक्षणिक साहित्य सहज उपलब्ध करून दिले जात आहे. यासोबतच शैक्षणिक संसाधनांचा पुनर्वापर, डिजिटल अध्ययन साहित्याचे केंद्रीकरण, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि स्वयंअध्ययनाला प्रोत्साहन देण्याचे कार्यही संस्था सातत्याने करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


उपस्थित मान्यवरांनी ज्ञानरचना सोशल फाउंडेशनच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठा आधार मिळत असल्याचे मत व्यक्त केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *