‘अर्थविश्व’ मार्गदर्शक पुस्तकाचे प्रकाशन; आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गट चळवळीला नवी दिशा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आर्थिक सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि समाजामध्ये बचतीची सुदृढ संस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने अर्थ आधार शक्ती फेडरल बचत गटाच्या वतीने आयोजित बचत गटाचा मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या मेळाव्यात बचत गटाच्या सर्वांगीण विकासाला दिशा देणाऱ्या ‘अर्थविश्व’ या मार्गदर्शक पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
अर्थ आधार शक्ती फेडरल बचत गटाचे प्रथम सदस्य मोहनराव नागवडे यांच्या हस्ते ‘अर्थविश्व’ या मार्गदर्शक पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. बचत गटाचे अध्यक्ष विजय गाडळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास सचिव मेजर शिवाजी वेताळ, पंडितराव हराळ गुरुजी, प्राचार्य खासेराव शितोळे, प्रा. भगवान काटे, डॉ. रमेश वाघमारे, राजेंद्र गुंड, सुधाकर बोरुडे, सुरेश ढवळे, परशुराम कोतकर, राजाराम रोहोकले, आंधळे, ॲड. महेश शिंदे, संतोष आंबेकर, दत्ता वामन, चिंतामणी, कासार, पर्वतराव हराळ, नामदेव गुंड, ताराचंद भणगे, मेजर शिंदे, परमेश्वर पाटील, सौ. सूर्यवंशी, परविन शेख, अश्विनी कातकडे यांच्यासह बचत गटाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात आंधळे यांनी बचत गटाच्या स्थापनेमागील उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितले की, “सर्वांच्या श्रीमंतीत आपली श्रीमंती आणि आपल्या श्रीमंतीतून सर्वांची श्रीमंती” या विचारधारेवर हा बचत गट कार्यरत आहे. आर्थिक शोषणमुक्त, स्वावलंबी आणि कल्याणकारी समाजव्यवस्था उभारण्याचा ध्यास घेऊन गटाने गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने कार्य केले आहे. सदस्यांमध्ये आर्थिक साक्षरता, पारदर्शक व्यवहार, शिस्त, आत्मविश्वास आणि स्वयंप्रेरणा निर्माण करून त्यांचे शाश्वत आर्थिक कल्याण साधण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राचार्य खासेराव शितोळे म्हणाले की, आजच्या स्पर्धात्मक आणि वेगवान जीवनात आर्थिक नियोजन हे प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यावश्यक झाले आहे. उत्पन्न किती आहे यापेक्षा त्याचे योग्य व्यवस्थापन कसे केले जाते, यावर व्यक्तीचे भविष्य अवलंबून आहे. यासाठी बचत गट चळवळ सर्वोत्तम ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. पंडितराव हराळ गुरुजी यांनी बचत गट ही केवळ पैशांची देवाणघेवाण करणारी संस्था नसून ती सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे. अर्थविश्व’ हे पुस्तक प्रत्येक सदस्याला आर्थिक शिस्त, बचत, गुंतवणूक आणि स्वावलंबनाचा मार्ग दाखवेल. शिक्षणाप्रमाणेच आर्थिक साक्षरतेचीही गरज आज प्रत्येक कुटुंबाला असल्याचे सांगितले.
प्रा. भगवान काटे म्हणाले की, स्वावलंबी समाजाची पायाभरणी बचतीपासून सुरू होते. नियमित बचत, योग्य गुंतवणूक आणि नियोजनबद्ध आर्थिक व्यवहार ही प्रत्येक कुटुंबाची ताकद आहे. अर्थ आधार शक्ती फेडरल बचत गटाने अल्पावधीत केलेली प्रगती ही त्यांच्या पारदर्शक कार्यपद्धतीची साक्ष आहे. प्रकाशित झालेले ‘अर्थविश्व’ हे पुस्तक केवळ नियमावली नसून आर्थिक प्रगतीचा रोडमॅप आहे. विशेषतः युवक, महिला आणि शेतकरी यांच्यासाठी हे पुस्तक प्रेरणादायी ठरेल. संघटित बचत आणि परस्पर सहकार्याच्या बळावर आर्थिक क्रांती घडवून आणता येते, हे या संस्थेने सिद्ध केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
परशुराम कोतकर म्हणाले की, कोणतीही मोठी आर्थिक उभारणी छोट्या बचतीपासून सुरू होते. प्रत्येक सदस्याने बचतीला सवय बनवून आर्थिक शिस्त अंगीकारली पाहिजे. आर्थिक संकटाच्या काळात बचत गट हा केवळ आधार नसतो, तर तो आत्मविश्वास वाढविणारा साथीदार असतो. अर्थ आधार शक्ती फेडरल बचत गटाने दोन सदस्यांपासून सुरू झालेला प्रवास आज हजारो सदस्यांपर्यंत पोहोचविला आहे. ही यशोगाथा प्रत्येकासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
विजय गाडळकर म्हणाले की, ‘सर्वांच्या विकासातच आपला विकास’ हा विचार स्वीकारून समाजातील प्रत्येक घटक आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपण सर्वांनी या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा. ‘अर्थविश्व’ हे पुस्तक प्रत्येक सदस्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ ठरेल आणि आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय लिहिण्यास निश्चितच मदत करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी प्रकाशित करण्यात आलेले ‘अर्थविश्व’ हे मार्गदर्शक पुस्तक बचत गटांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून त्यामध्ये आर्थिक सक्षमीकरण, बचतीचे महत्त्व, आर्थिक नियोजन, गुंतवणूक, कर्ज व्यवस्थापन, संघटनात्मक शिस्त आणि सदस्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. या पुस्तिकेमध्ये सदस्यत्व प्रक्रिया, संघटन रचना, कार्यपद्धती, कर्ज वितरण, परतफेड व्यवस्था, विशेष योजना, नफा वितरण प्रणाली तसेच सदस्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. कृषी, उद्योग, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य आणि सेवा क्षेत्रात सदस्यांचा सक्रिय सहभाग वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे उद्दिष्ट गटाने निश्चित केले आहे.
कार्यक्रमात बचत गटाच्या उल्लेखनीय प्रवासाचाही आढावा घेण्यात आला. जानेवारी 2013 मध्ये अवघ्या दोन सदस्यांपासून सुरू झालेल्या या बचत गटात आज 1,680 हून अधिक सदस्य सहभागी झाले असून गटाची वार्षिक आर्थिक उलाढाल तब्बल 11 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. वाढत्या विस्तारामुळे गटाचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता संपूर्ण भारतभर विस्तारण्यात आले असून संस्थेचे नामकरण ‘अर्थ आधार शक्ती फेडरल बचत गट’ असे करण्यात आले असल्याची माहिती संचालकांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेजर शिवाजी वेताळ यांनी केले, तर राजेंद्र गुंड यांनी आभार मानले.

