उत्कृष्ट सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या महिलांचा सन्मान; 300 महिला सदस्यांच्या योगदानातून वंचितांच्या जीवनात उजेड
सेवाप्रीत वंचितांच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी प्रयत्नशील -जागृती ओबेरॉय
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजातील दुर्लक्षित आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनचा दहावा वार्षिक स्नेहमेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मागील दहा वर्षांत संस्थेने केलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा यावेळी घेण्यात आला. तसेच समाजसेवेसाठी निस्वार्थपणे योगदान देणाऱ्या महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. मागील वर्षभरात उत्कृष्ट सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या ग्रुप लिडर आणि सदस्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा जागृती ओबेरॉय, संचालक तथा ग्रुप लिडर अन्नू थापर, अर्चना खंडेलवाल, डॉ. सिमरन वधवा, गीता नय्यर, गितांजली माळवदे, निशा धुप्पड, रितू वधवा, सविता चड्डा, स्विटी पंजाबी यांच्यासह संस्थेच्या अनेक महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना जागृती ओबेरॉय यांनी सेवाप्रीतच्या दहा वर्षांच्या सामाजिक प्रवासाचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या की, सर्व महिलांच्या एकत्रित सहभागातून आणि सामाजिक बांधिलकीतून सेवाप्रीतची वाटचाल सुरू आहे. शहरातील सुमारे 300 महिला अधिकृतपणे संस्थेशी जोडल्या गेल्या असून त्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान देत आहेत. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, वंचित कुटुंबांना मदत करणे आणि समाजातील दुर्लक्षित घटकांना आधार देणे या माध्यमातून सेवाप्रीत समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणत आहे.
“परमेश्वर कोणत्या रूपात आणि केव्हा भेटेल हे कुणालाही सांगता येत नाही. प्रत्येक व्यक्तीत परमेश्वराचे अस्तित्व आहे आणि त्या परमेश्वराची सेवा करण्याचे कार्य सेवाप्रीतच्या माध्यमातून केले जात आहे,” असे सांगताना त्यांनी सामाजिक सेवेचे महत्त्व अधोरेखित केले. दिवा स्वतः जळून इतरांना प्रकाश देतो, त्याचप्रमाणे सेवाप्रीतच्या सदस्या आपल्या कृतीतून इतरांच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने झाली. त्यानंतर महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक आणि बौद्धिक खेळांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना उपस्थित महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्नेहमेळाव्याचा सांस्कृतिक कार्यक्रमही विशेष आकर्षण ठरला. महिलांनी गायन, नृत्य तसेच विविध कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. टाळ्यांच्या कडकडाटात उपस्थितांनी कलाकार महिलांचे कौतुक केले. महिलांना हातावर आकर्षक सेवाप्रीतचा लोगो असलेला टॅटू काढण्यात आला होता.
यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तानिया मुलतानी यांनी महिलांसाठी विविध खेळ घेतले. स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच वर्षभरात झालेल्या तंबोला खेळाचे देखील बक्षीस वितरण करण्यात आले. स्नेह, सेवा, सामाजिक बांधिलकी आणि महिलांच्या एकतेचा संदेश देणारा हा स्नेहमेळावा रंगला होता.

