दोन महिन्यांपासून विस्कळीत पाणीपुरवठा, सात दिवसांत तोडगा न निघाल्यास महापालिकेत ठिय्या आंदोलनाचा इशारा
कमी दाब, अनियमित वेळा आणि घाण पाण्यामुळे नागरिकांचे हाल
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील आगरकर मळा, आनंदनगर, सागर कॉम्प्लेक्स तसेच काटवण खंडोबा रोड परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा गंभीरपणे विस्कळीत झाला असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभाग प्रमुख परिमल निकम यांना निवेदन देऊन परिसरातील समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले. यावेळी अमोल गाडे, माजी नगरसेवक सुनील काळे, नगरसेवक दत्ता गाडळकर, सुजय मोहिते, माजी नगरसेवक विजय गव्हाळे आदी उपस्थित होते. निवेदनाद्वारे पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली असून, पुढील सात दिवसांत प्रश्न न सुटल्यास नागरिकांच्या वतीने महापालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सदर परिसरात पाणी अत्यंत कमी दाबाने येत असल्याने अनेक घरांपर्यंत पुरेशा प्रमाणात पाणी पोहोचत नाही. याशिवाय पाणीपुरवठ्याच्या वेळा पूर्णपणे अनियमित झाल्या आहेत. कधी पहाटे, तर कधी मध्यरात्रीनंतर पाणी सोडले जात असल्याने नागरिकांना रात्रभर जागून पाण्याची वाट पाहावी लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांच्या कुटुंबांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
याशिवाय नळाद्वारे घाण व दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून पाण्यातून पसरणाऱ्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने अनेकांना पाणी विकत घेण्याची वेळ येत आहे. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी पाणीपुरवठा विभाग प्रमुखांसमोर परिसरातील समस्यांचा पाढाच वाचला. महापालिकेकडे नियमितपणे पाणीपट्टी भरूनही नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर परिसरात प्रामुख्याने सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबे वास्तव्यास आहेत. रोजच्या वापरासाठी तसेच पिण्यासाठी पाणी विकत घेणे त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाने तातडीने परिस्थितीची पाहणी करून कमी दाबाने होणारा पुरवठा, अनियमित वेळापत्रक आणि दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

