शाळेने उमटवली गुणवत्तेची छाप
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- कापड बाजार येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत आपल्या गुणवत्तेची छाप पाडली असून, राज्याच्या गुणवत्ता यादीत 9 तर जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत 32 विद्यार्थी चमकले आहे. मंथन प्रज्ञाशोध परीक्षेच्या गुणवत्ता यादीत सर्वाधिक विद्यार्थी येण्याचा बहुमान शाळेने पटकाविला आहे.
टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झालेल्या शाळेच्या पालक, शिक्षक मेळाव्यात या गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, शिक्षण उपसंचालक (पुणे) रमाकांत काटमोरे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, उत्तर विभागाचे निरीक्षक टि.पी. कन्हेरकर, विस्तार अधिकारी कापरे, अशोक बाबर, कैलास मोहिते, विश्वासराव काळे, श्यामराव व्यवहारे, शिक्षण तज्ञ इम्रान तांबोळी, शेखर उंडे, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी लंके, माध्यमिकचे मुख्याध्यापक एस.एल. ठुबे, कडूस आदींसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक शिवाजी लंके यांनी शाळेचे विद्यार्थी गुणवत्तेबाबत आघाडीवर असून, प्रज्ञाशोध परीक्षेत सर्वाधिक विद्यार्थी येण्याचा बहुमान शाळेने पटकाविला असल्याचे सांगितले. ज्ञानदेव पांडुळे यांनी प्रस्थापित शाळांना मागे टाकून रयतच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटीलने संस्थेचे नांव उंचावले आहे. रयतच्या शाळेत गुणवत्तापुर्ण शिक्षण देऊन सर्वसामान्यांच्या मुलांना घडविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. टि.पी. कन्हेरकर यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता पालकांसाठी चळवळ म्हणून रुजली गेली पाहिजे. यासाठी शाळा व पलाकांनी एकत्रपणे योगदान देण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले.
दादाभाऊ कळमकर म्हणाले की, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळा गुणवत्तेबाबत ओळखली जात आहे. विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणापेक्षा स्पर्धा परीक्षांना सामोर जाण्याचे आवाहन केले. रमाकांत काटमोरे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचा अधिक ताण न देता त्यांना हसत खेळत शिक्षण देण्याची गरज आहे. लहानपणा पासूनच विद्यार्थ्यांना आलेले अपयश पचविण्याचे व यशाने योग्य मार्गक्रमण करण्याचे शिकवण्याचे स्पष्ट केले.
शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत चौथी आलेली आर्या रविंद्र जाधव, राज्यात पाचवा आलेला अर्णव भारत बोरुडे, कीर्ती प्रविण शिरसे, राज्यात सहावा आलेला वरद बाबाजी झावरे, राज्यात सातवी आलेली सई शेखर उंडे, सिद्धेश विनायक गोरे, आयुष रविंद्र फाटक, सुरभी शिवाजी मोकाशे यांच्यासह जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत आलेल्या 32 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या विद्यार्थ्यांना शिक्षक मीनाक्षी खोडदे, उर्मिला साळुंके, सुजाता दोमल, शितल रोहोकले, जयश्री खांदोडे, राहुल शिंदे, सचिन निमसे, सोनाली वेताळ, इंदुमती दरेकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल विभागीय अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उर्मिला साळुंखे यांनी केले. आभार सुजाता दोमल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय शिक्षकांनी परिश्रम घेतले.