कृती समितीचे आयुक्तांना निवेदन; शनिवारी सकाळी 10 वाजता होणार अभिवादन कार्यक्रम
स्वच्छता व बैठक व्यवस्थेचीही मागणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (दि. 11 एप्रिल 2026) माळीवाडा वेस येथील त्यांच्या पुतळ्यासमोर महापालिकेतर्फे मंडप उभारण्यात यावा, अशी मागणी क्रांतीज्योती सावित्रीबाई महात्मा ज्योतिराव फुले कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.
जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमासाठी शहरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सकाळी 10 वाजता आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योतीताई गाडे तसेच उपमहापौर धनंजय जाधव यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती कृती समितीचे अध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी दिली.
या पार्श्वभूमीवर, जयंतीच्या दिवशी पुतळा परिसराची स्वच्छता करण्यात यावी, तसेच नागरिकांसाठी योग्य बैठक व्यवस्था आणि मंडप उभारण्यात यावा, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने नागरिक आणि विविध संघटनांचे पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याने योग्य सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे समितीने नमूद केले आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी हा कार्यक्रम उत्साहात पार पडणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
