• Thu. Mar 26th, 2026

सराफ सुवर्णकार समाजाच्या वतीने ॲड. डॉ. गौरव डहाळे याचा गौरव

ByMirror

Mar 26, 2026

विधी अधिकारीपदी नियुक्ती आणि पीएचडी पदवीने वाढवला जिल्ह्याचा मान


डहाळे यांना देशसेवेची संधी -आ. संग्राम जगताप

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- प्रवर्तन संचालनालय (ईडी) मध्ये विधी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल तसेच विधी क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण पीएचडी पदवी संपादन केल्याबद्दल ॲड. डॉ. गौरव सुनिल डहाळे यांचा अहिल्यानगर जिल्ह्यातील सराफ सुवर्णकार समाजाच्या वतीने गौरव सत्कार करण्यात आला. कमी वयात हे यश संपादन करणारे डहाळे हे जिल्ह्यातील पहिले युवक ठरले असून, त्यांच्या या यशामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.


शहरातील संजोग लॉन येथे आयोजित सन्मान सोहळा आमदार संग्राम जगताप व मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी मजुर फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब जगताप, श्‍यामशेठ देडगावकर, सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचे चेअरमन उमेश बुऱ्हाडे (बारामती), विशाल वेदपाठक, स्केटिंग प्रशिक्षक प्रशांत पाटोळे, पीएचडी मार्गदर्शक ॲड. समीर चव्हाण, उपप्राचार्य गोकुळदास लोखंडे, ॲड. राजेंद्र सेलोत, ॲड. अनिल सरोदे,
ॲड. आशिष पाटणकर, सुरज पालबंश, जॉन पठारे, वैभव बागुल, ॲड. श्रेयश देवरे, ॲड. ललित गुंदेचा, सुभाषशेठ कायगावकर, प्रकाश लोळगे, मयूर कुलथे, नगरसेवक मयूर (बाली) बांगरे, ॲड. प्रसन्न बिंगी, अजित जगताप, राहुल टाकळकर, सुनील मंचरकर आदी मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रमोद बुऱ्हाडे यांनी गौरव डहाळे यांच्या यशाचा आढावा घेत, त्यांच्या कर्तृत्वामुळे समाजाला अभिमान वाटत असल्याचे सांगितले. शैक्षणिक तसेच स्केटिंग क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी मिळवलेल्या यशाची माहिती त्यांनी दिली. वकिली व्यवसायातून मिळवलेले यश आणि सातत्यपूर्ण मेहनतीचा प्रवासही त्यांनी मांडला. कार्यक्रमाचे स्वागत सुनिल डहाळे व सौ. मेघा डहाळे यांनी केले.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, शहराच्या दृष्टीने मान उंचावणारा क्षण आहे. हा पहिल्यांदाच मान मिळाला आहे. विविध संस्था देशाच्या रक्षणासाठी कार्य करत असून, ईडी ही वित्तीय संस्था महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आर्थिक दृष्ट्या सर्वसामान्यांची फसवणूक होऊ नये व आर्थिक फसवणुक व घोटाळे करणाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी देशात प्रवर्तन संचालनालय कार्यरत आहे. या कार्यात गौरव डहाळे यांना संधी मिळाली असून, ही देश सेवेचे कार्य त्यांच्या हातून घडणार असल्याचे त्यांनी सांगितले.


आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, आपल्या शहरातून ईडी मध्ये कायदेशीर अधिकारी घडतो कौतुकास्पद आहे. स्पर्धा परीक्षाद्वारे अधिकारी होवून सर्वसामान्य न्याय देण्याचे व सामाजिक कार्य करण्याची संधी मिळते. इतर मित्र मोठे पॅकेज घेऊन देश-विदेशात स्थायिक होतात. मात्र मनातील जिद्द हा प्रवास यश मिळवल्याशिवाय गप्प बसू देत नाही, शेवटी मिळालेले यश समाधान देणारे असल्याचे त्यांनी सांगितले.


उमेश बुऱ्हाडे यांनी सराफ व्यावसायिकांना होणाऱ्या त्रासाबाबत भाष्य करत, कायदेशीर मार्गदर्शनाची गरज अधोरेखित केली. गौरव डहाळे यांच्या सहकार्याने समाजाला अधिक बळ मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. भ्रष्टाचारापासून दूर राहून प्रामाणिकपणे काम करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
उपप्राचार्य गोकुळदास लोखंडे यांनी गौरव डहाळे यांच्यातील गुणवत्ता आणि जिद्दीचा उल्लेख करत, उत्तम विद्यार्थी घडविल्याचे समाधान व्यक्त केले. सामाजिक बांधिलकी जपत अधिकारी म्हणून काम करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. ॲड. राजेंद्र सेलोत यांनी विधी क्षेत्रातील संधींचा आढावा घेत, कायद्याच्या चौकटीत राहून समाजाचे प्रश्‍न सोडवता येतात, असे सांगितले. ईडीसारख्या महत्त्वाच्या संस्थेत काम करताना देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी गौरव डहाळे यांना मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.


स्केटिंग प्रशिक्षक प्रशांत पाटोळे यांनी लहानपणापासूनच गौरवमध्ये असलेली जिद्द, चिकाटी आणि शिस्त यामुळेच हे यश शक्य झाल्याचे सांगितले. ॲड. प्रसन्न बिंगी यांनी त्यांच्या वाचनाच्या सवयीमुळे त्यांनी व्यापक ज्ञान आत्मसात केल्याचे नमूद केले. विशाल वेदपाठक यांनी सराफ सुवर्णकार समाजासाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगितले. समाजातील युवक उच्च पदावर पोहोचल्याने संपूर्ण समाजासाठी तो प्रेरणादायी ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगरसेवक मयूर (बाली) बांगरे यांनी गौरव डहाळे यांच्याशी असलेले मैत्रीचे नाते सांगत, दोघांनीही आपल्या क्षेत्रात यश मिळवल्याचा अभिमान व्यक्त केला.
यावेळी गौरव डहाळे यांच्या आई-वडिलांनी व्हिडिओद्वारे भावनिक संदेश दिला. लहान भाऊ सौरव डहाळे यांनी गौरवचे शिक्षण आणि खेळातील समर्पण अधोरेखित करत, तो कुटुंबासाठी प्रेरणास्थान असल्याचे सांगितले.


सत्काराला उत्तर देताना ॲड. डॉ. गौरव डहाळे यांनी आपल्या यशाचे श्रेय गुरुजन व मार्गदर्शकांना दिले. “आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू येईपर्यंत संघर्ष करत राहा,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
या प्रसंगी सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या वतीने ॲड. डॉ. गौरव डहाळे यांचा “समाजरत्न” पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच त्यांच्या यशात योगदान देणाऱ्या सर्व गुरुजन व मार्गदर्शकांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार सोमनाथ मैड यांनी मानले. यावेळी स्वप्निल राजूरकर, सुनील कुलथे, सदाशिव मैड, देविदास अंबिलवादे, सुजित बोकन आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *