• Wed. Feb 5th, 2025

आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने शहराचा पाणी प्रश्‍न कायमचा सुटू शकणार -प्राचार्य खासेराव शितोळे

ByMirror

Jul 2, 2022

एक तास राष्ट्रवादीसाठी उपक्रमातंर्गत कल्याण रोड येथील अनुसयानगरला बैठक

युवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- संपूर्ण शहरासह उपनगरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर होत असून, त्याला महापालिकेची वितरण व्यवस्था जबाबदार आहे. आमदार संग्राम जगताप यांनी पुढाकार घेतल्यास शहराचा पाणी प्रश्‍न कायमचा सुटू शकणार असल्याचा विश्‍वास माजी प्राचार्य खासेराव शितोळे यांनी व्यक्त केल. तर शहर विकासाचा आराखडा तयार करुन विकासात्मक व्हिजनने त्यांची वाटचाल सुरु असून, जनता त्यांच्या पाठिशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी या उपक्रमांतर्गत प्रभाग क्रमांक 8, कल्याण रोड येथील अनुसयानगर महालक्ष्मी मंदीराच्या आवारात पक्षाचे पदाधिकारी व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये संवाद कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्षीय भाषणात शितोळे बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, उपाध्यक्ष अनंत गारदे, सोपानराव कदम, ओबीसी सेलचे अमित खामकर, भाऊसाहेब थोटे, मारुती पवार, उमेश धोंडे, महेंद्र माखिजा, धिरज पठडा, विरु शेकटकर, लक्ष्मण खोडदे, निखील खामकर, जय लोखंडे, विजय वाघ, सतीश परदेशी, मंगेश धोंडे, वैष्णव मुंडलिक, विकास करपे आदींसह परिसरातील नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे माजी प्राचार्य शितोळे म्हणाले की, आंदोलन करण्याचा पिंड असल्याने या भागातील रस्ते, पाणी, ड्रेनेडलाईन या मूलभूत प्रश्‍नासाठी आंदोलने केली व अटकही झाली. मागील 25 वर्षानंतर काही प्रमाणात विकासात्मक बदल दिसत आहे. या भागात डांबरी रस्ते टिकत नसल्याने, टिकाऊ अशा सिमेंटच्या रस्त्यांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात युवराज शिंदे यांनी सुशिक्षित व युवा नेतृत्व असल्यास प्रारभागाचा व शहराचा विकास साधला जात असतो. हे आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने दाखवून दिले असल्याचे सांगितले. यावेळी युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीत दाखल झालेले उमेश धोंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हा सरचिटणीसपदी तर भगवान काटे यांची शहर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. शहर जिल्हाध्यक्ष प्रा. विधाते यांनी नुतन पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला.


प्रा. माणिक विधाते म्हणाले की, पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी शहराच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचे काम केले. विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी त्यांनी आणला. राज्यात, केंद्रात कोणाचीही सत्ता असली तरी विकासात्मक व्हिजनने त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. नुकतेच त्यांनी सीना नदीच्या सुशोभीकरणासाठी 6 कोटी रुपयांचा निधी आणला असून, नागरिकांनी देखील विकासाला साथ देण्याची गरज आहे. सध्या सरकार बदलले असले तरी, शहराच्या विकासात अडथळा येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यांनी केले. आभार अमित खामकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *