नवनिर्वाचित नगरसेविकांचा गौरव,
महिलांचे सामाजिक कार्याला बळ
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- यशवंती मराठा महिला मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हळदी-कुंकू समारंभ मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात ग्रुपमधील नवनिर्वाचित नगरसेविका गीतांजली काळे, दिपाली बारस्कर व शारदाताई ढवण यांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. महिलांनी एकमेकांना शुभेच्छा देत सामाजिक कार्याचा जागर केला.
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या किरणताई संपत बारस्कर, मंगल काळे, सुनिता काळे, सुरेखा बारस्कर होत्या. किरणताई बारस्कर आपल्या भाषणात त्या म्हणाल्या की, यशवंती मराठा महिला मंडळ नेहमीच उत्कृष्ट आणि समाजोपयोगी कार्य करत असून, या ग्रुपच्या माध्यमातून महिला सामाजिक चळवळीशी सक्रियपणे जोडल्या गेल्या आहेत. महिलांना संघटित करून समाजकार्याची दिशा देण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
नवनिर्वाचित नगरसेविका गीतांजली काळे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, ग्रुपची जिल्हाध्यक्ष असल्याने कुटुंबीयांच्या सदस्यांकडून मिळालेला हा सन्मान अत्यंत महत्त्वाचा आहे. घरची माणसे पाठीशी असतील, तर कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचे त्या म्हणाल्या. नगरसेविका दिपाली बारस्कर यांनी हा ग्रुप म्हणजे आमचे हक्काचे माहेर आहे. माहेरकडून मिळणारा सन्मान आम्हाला नेहमीच मोलाचा वाटतो.
ग्रुपच्या संस्थापिका मायाताई कोल्हे यांनी सांगितले की, सर्व सख्या एकत्र आल्या की नवी प्रेरणा मिळते, नवे विचार जन्माला येतात. सर्वांचे विचार एकत्र घेऊन सामाजिक कार्य अधिक प्रभावीपणे करता येते. ग्रुपमधील महिला विविध क्षेत्रात भरीव योगदान देत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नगरसेविका शारदाताई ढवण म्हणाल्या की, सर्व महिलांनी केलेला सन्मान अभिमानास्पद आहे. महिलांसाठी हा ग्रुप एक प्रभावी व्यासपीठ असून सामाजिक कार्यासाठी चालना देणारा असल्याचे स्पष्ट केले. शहराध्यक्ष मीराताई बारस्कर यांनी प्रास्ताविकातून ग्रुपच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली व जास्तीत जास्त महिलांनी या ग्रुपमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
आशाताई शिंदे म्हणाल्या की, शेवटच्या क्षणापर्यंत जिजाऊ-शिवरायांच्या विचारधारेवर सर्व महिला कार्य करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपजिल्हाध्यक्षा कविता दरंदले यांनी वर्षभर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त करताना, अनाथ मुले व वृद्धांसाठी काम करताना आत्मिक समाधान मिळते, असे सांगितले.
यावेळी डॉ. इंगोले यांनी स्त्रियांमध्ये वाढत चाललेल्या कॅन्सरविषयी सखोल मार्गदर्शन केले. कॅन्सरवरील उपचार, तपासणी व प्रतिबंध याबाबत सविस्तर माहिती देऊन महिलांमध्ये जनजागृती केली. राजश्री शेळके यांनी मराठा महिला मंडळ हे महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ असून ग्रुपचे कार्य नेहमी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. सारिका तट म्हणाल्या की, हा ग्रुप आमचा अभिमान आहे. जिजाऊ-शिवरायांच्या विचारधारेवर चालणारा हा ग्रुप असून, आपण याचा भाग आहोत याचा आम्हाला अभिमान वाटत असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमादरम्यान विविध मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या महिलांना बक्षिसे देण्यात आली तसेच लकी ड्रॉ काढून भाग्यवान विजेत्यांना आकर्षक बक्षिसांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी कल्पना भंडारे, सुरेखा बारस्कर,माधवी दांगट, ज्योती गंधाडे, नंदा मुळे, मेघा झावरे, लता भापकर, मंगल शिरसाठ, अनिता मोरे, शैला थोरात, सुनिता जाधव, मंगल काळे,सुनिता काळे,शारदा तांबे, मंगल देशमुख, सुनिता घाडगे, मंगल शिर्के, निर्मला लोणकर, राजश्री पोहेकर, वंदना गोसावी, वर्षा लगड, पूजा पल्लवी, शिल्पा मुक्ता आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी जाधव व शर्मिला कदम यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रतिभा भिसे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अर्चना बोरुडे व सोहनी पुरणाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
