• Sat. Jan 31st, 2026

भिंगारमध्ये सर्वपक्षीयांच्या वतीने उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली

ByMirror

Jan 30, 2026

मारुती मंदिरात शोकसभेत राजकीय नेते हळहळले, कार्यकर्ते व नागरिकांची मोठी उपस्थिती


भिंगारच्या विकासात स्व.अजीत पवार यांचे महत्त्वाचे योगदान ठरले -संजय सपकाळ

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार शहरात सर्व राजकीय पक्षांच्या वतीने विमान दुर्घटनेत निधन झालेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. भिंगार येथील मारुती मंदिरात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेला सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण भिंगार परिसर शोकमग्न वातावरणाने व्यापला होता.


शोकसभेच्या प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. माणिक विधाते व भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ यांच्या हस्ते स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शिवम भंडारी, भाजपचे महेश नामदे, शिवसेनेचे रवींद्र लालबोंद्रे, आरपीआय (आठवले)चे अमित काळे, काँग्रेसचे ॲड. साहेबराव चौधरी, जहीर सय्यद, सदाशिव मांढरे, विलास तोडमल, दीपक लिपाने, अक्षय नागापुरे, सर्वेश सपकाळ, प्रशांत डावरे, सिद्धार्थ आढाव, अनिल तेजी, सागर चवंडके, संकेत झोडगे, दिनेश लंगोटे, अभिजीत सपकाळ, दीपकराव धाडगे, दिलीप ठोकळ, अशोक पराते, अविनाश पोतदार, संतोष हजारे, संतोष बोबडे, शरद धाडगे, दिनकर धाडगे, अर्जुन धाडगे, रमेश भिंगारदिवे, कानिफनाथ फुलारी, भाजप शहराध्यक्ष सचिन जाधव, प्रज्योत लुनिया, शिवसेना शहराध्यक्ष सुनील लालबोंद्रे, काँग्रेसचे श्‍यामराव वाघस्कर, निजाम पठाण, राष्ट्रवादी (शरद पवार) शहराध्यक्ष किरण सपकाळ, मतीन सय्यद, बाळासाहेब ढमाले, उद्योजक रवींद्र फल्ले, किशोर उपरे, सौरभ रासने, अनंत रासने, राजू जंगम, प्रदीप जाधव, जनाभाऊ भिंगारदिवे, मच्छिंद्र भिंगारदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना संजय सपकाळ म्हणाले, उपमुख्यमंत्री अजीत पवार अजूनही आपल्यातून ते गेल्याचा विश्‍वास बसत नाही. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. परखड, स्पष्ट व विकासात्मक नेतृत्व महाराष्ट्राने गमावले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यावर त्यांचे विशेष प्रेम होते. भिंगारच्या विकासासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून त्यांनी निधी उपलब्ध करून दिला. भिंगारचा कायापालट होण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या भावना ओळखून त्यांनी सर्व समाजाला बरोबर घेऊन राजकारण व समाजकारण केल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. माणिक विधाते म्हणाले, “महाराष्ट्राने एक कणखर, स्पष्ट वक्ता आणि जलद निर्णय क्षमता असलेला नेता गमावला आहे. त्यांच्या निर्णयक्षमतेमुळे अनेक विकासकामांना गती मिळाली.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा असून, त्यांच्या निधनाने राज्य पोरके झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वसंत राठोड यांनी उपमुख्यमंत्री म्हणून अजीत पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळा ठसा उमटवला. त्यांचे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही. प्रशासनावर पकड ठेवून काम करून घेण्याची त्यांची पद्धत अत्यंत प्रभावी असल्याचे सांगितले.
अमित काळे म्हणाले, “अजित पवार यांनी जाती-पातीचे राजकारण न करता विकास आणि माणुसकी हाच धर्म मानून कार्य केले. महाराष्ट्राची नस-नाडी ओळखणारा नेता राज्याने गमावला आहे.”


महेश नामदे म्हणाले, “कामाचा मोठा आवाका, वेळेचे व शब्दाचे पालन करणारे नेते म्हणून ते ओळखले जात. असा नेता पुन्हा होणे नसल्याचे सांगितले. रवींद्र लालबोंद्रे यांनी सर्व पक्षीयांना अजित पवार यांच्या निधनाने मोठा धक्का बसला असल्याचे स्पष्ट केले. तर ॲड. साहेबराव चौधरी यांनी अजित पवार म्हणजे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते. सर्वांना सोबत घेऊन चालणारे, सर्वसमावेशक व धुरंधर नेते देशाने गमावले असल्याचे दुःख व्यक्त केले. उपस्थितांनी स्व. अजीत पवार यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन त्यांना श्रध्दांजली वाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *