पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पोलीस रेझिंग डे (स्थापना दिन) निमित्त स्नेहबंध फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत ईशानी अमित खामकर हिने प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रजासत्ताक दिनी पोलीस मुख्यालयात पार पडले.
या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते ईशानी हिला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे, स्नेहबंध फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, तसेच सुप्रिया अमित खामकर उपस्थित होत्या.
पोलीस रेझिंग डेच्या निमित्ताने आयोजित या चित्रकला स्पर्धेला शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लहान वयोगटातील विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
एलकेजी गटात ईशानी खामकर हिने रेखाटलेले चित्र अत्यंत कल्पक, स्वच्छ व आशयपूर्ण असल्याने परीक्षकांनी तिची प्रथम क्रमांकासाठी निवड केली. ईशानीच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
